लोटे औद्योगिक वसाहत कामगारांसाठी ठरतेय मृत्यूचा सापळा घरडा केमिकल्स कारखान्यात रिऍक्टरचा स्फोट होऊन चार कामगारांचा मृत्यू तर दोघे गंभीर
खेड : लोटे औद्योगीक वसाहत कामगारांसाठी दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा ठरू लागली आहे. येथील सुप्रिया लाइफ सायन्स या कारखान्यात आग लागून तीन कामगार जखमी होण्याच्या घटनेला आठ दिवस उलटायच्या आतच येथील घरडा केमिकल्स या रासायनिक कारखान्यात रिऍक्टरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी झाले. सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या या स्फोटाने लोटे परिसर हादरून गेला. मागच्या सोमवारी तीन कामगार जखमी आता आज चौघांचा मृत्यू तर दोघे जखमी त्यामुळे या औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार सुरक्षित आहेत काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल्स या रासायनिक कारखान्याच्या प्लॅन्ट नंबर ७ मध्ये सकाळी ८.३० वाजता रिऍक्टरमधील तापमान अचानक वाढल्याने रिऍक्टरचा स्फोट झाला आणि उसळलेल्या वाफसदृश आगीत प्लॅन्टमध्ये काम करणारे दोन कामगार जळून जागीच ठार झाले तर चार कामगार गंभीर जखमी झाले. दुर्घटनेनंतर कंपनी व्यवस्थापनाने तात्काळ हालचाल करत जखमी कामगारांना मुंबई ऐरोली येथील रुग्णालयात हलविण्याचे प्रयत्न केले. मात्र गंभीर जखमी असलेल्या आणखी दोन कामगारांना वाटेतच मृत्यूने गाठले..
घरडा रासायनिक कारखान्यात स्फोट होऊन आग लागली असल्याचे कळताच लोटे औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र कंपनी व्यवस्थापनाने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना कारखान्यात प्रवेश करण्यात मनाई केल्याने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या प्रवेशद्वारावरच थांबावे लागले. कंपनी व्यवस्थापनाने स्वतःच्या अग्निरोधक यंत्रणेने सुमारे दिड तासांच्या अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले. जेव्हा ही दुर्घटना घडली ती वेळ सकाळच्या नाश्त्याची असल्याने प्लॅन्टमधील बरेचसे कामगार नाश्त्यासाठी कॅन्टीनमध्ये गेले होते. अन्यथा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता होती.
लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यांमध्ये असे जीवघेणे अपघात होण्याच्या घटना वारंवार घडत आल्या आहेत. याच घरडा कंपनीत आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे तर काहीजण कायमचे जायबंदी झाले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी रोजगाराची गरज म्हणून या औद्योहजिक वसाहतीत कामगार तोंड दाबून व्यवस्थापनाचा बुक्क्याचा मार खात आहेत. वेळ आली कि जगाचा निरोपही घेत आहेत. मात्र निर्ढावलेल्या कारखानदारांना त्यांचे काहीही सोयर सुतक नाही.
औद्योगिक वसाहतीतील कारखान्यामध्ये अपघात होऊ नये यासाठी स्वतंत्र शासकीय यंत्रणा कार्यरत आहेत. शासन या यंत्रणेवर लाखो रुपये खर्च करत आहे. मात्र कारखानदार शासकीय यंत्रणेशी संधान बांधून आपले उकल पांढरे करून घेण्यात तरबेज असल्याने अशा प्रकारचे जीवघेणे अपघात आता नित्याचेच ठरले आहेत.
www.konkantoday.com