
खेड तालुक्यातील ग्रामस्थांनी गणपती विसर्जन सुमारे तीन ते चार तास थांबवून ठेवले
खेड तालुक्यातील ग्रामस्थांनी गणपती विसर्जन सुमारे तीन ते चार तास थांबवून ठेवले होते. लोटे येथील गोशाळेतील जनावरांचे मलमूत्र मिश्रित पाणी सोनगाव घागवाडीतील ओढ्याला आल्यामुळे विसर्जन घाटावर जनावरांचे शेण असलेले पाणी दिसत होते. परिणामी असल्या दूषित पाण्यामध्ये गणेश विसर्जन कसे करावे, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला होता.
लोटे आणि धामणदेवीच्या सीमेवर महामार्गालगत एक गोशाळा आहे. या गोशाळेचे संचालक भगवान कोकरे महाराज असल्याचे समजते. या गोशाळेमध्ये सुमारे चारशे ते पाचशे जनावरे असून त्यांचे मलमूत्र मिश्रित पाणी नजिकच्या ओढ्याला सोडले जाते. हा ओढा पुढे सोनगाव घागवाडी येथे जातो. गणपतीच्या आगमनापूर्वीच भगवान कोकरे यांना या परिस्थितीची कल्पना देण्यात आली होती व निदान या गणेशोत्सवाच्या काळामध्ये तरी आपण हे पाणी ओढ्याला सोडू नका व आमचे गणेश विसर्जन व्यवस्थित होवू द्या, अशी विनंती केली होती. मात्र दीड दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनाच्यावेळी सुद्धा ओढ्याची परिस्थिती जैसे थे होती. सहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी भाग वाडीतील ग्रामस्थ या ओढ्यातील डोहाकाठी गणेशमूर्तींसह उपस्थित झाले. मात्र ओढ्यातील पाण्याची परिस्थिती पाहून ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. तात्काळ काही ग्रामस्थ लोटेतील गोशाळेमध्ये जावून कोकरे महाराजांना विसर्जन घाटावर येवून ओढ्यातील पाण्याची प्रत्यक्ष पाहणी करा, असे सांगितले.
सुमारे ४० ते ५० गणेशमूर्ती विसर्जनासाठी थांबल्या होत्या. तीनशे ते चारशे गणेश भक्त व ग्रामस्थ ताटकळत उभे होते. या सर्वार्ंंचा संताप अनावर झालेला होता. मात्र वाडीतील ज्येष्ठ नागरिकांनी संतापलेल्या ग्रामस्थांची समजूत काढून त्यांना शांत केले व पोलीस प्रशासनाला पाचारण केले.
या सर्व प्रकारामध्ये गणेशमूर्ती आणि भाविक सुमारे तीन ते चार तास विसर्जन घाटावर ताटकळत उभे राहिले होते. थोडया वेळाने लोटे पोलीस दूरक्षेत्राचे स.पो.नि. श्री. कदम आपल्या सहकार्यांसोबत घटनास्थळावर उपस्थित झाले.त्यांनी या प्रकरणी मध्यस्थी करून प्रश्न सोडविला www.konkantoday.com