राज्यातील लसीकरण प्रमाण व आरटीपीसीआर चाचण्यांबाबत केंद्राचे समाधान

पंतप्रधानांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेचा केला स्वीकार;

गेल्या वर्षीप्रमाणे आता देखील संसर्गाला रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पाऊले उचलण्यात येतील असा विश्वास देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी जेणे करून लसीकरणाचा वेग वाढवता येईल तसेच हाफकिनला लस उत्पादन करण्याची मान्यता मिळावी अशी विनंती केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांची सूचना लगेचच उचलून धरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात सर्व राज्यांमध्ये लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ व प्रोत्साहन देण्यात येईल असे जाहीर केले.
आज दुपारी देशातील काही राज्यातील वाढत्या कोविड संसर्गाच्या अनुषंगाने केंद्र सरकारने पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधले.
दररोज लाखांपर्यंत लसीकरण करण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की , लसीकरणासाठी ज्या केंद्रांची तयारी व क्षमता आहे अशा केंद्रांना किंवा रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी मिळावी. लसीकरणासाठी महाराष्ट्रात देखील अनेक खासगी रुग्णालयांनी नोंदणी केली आहे पण त्यापैकी किती जणांची प्रत्यक्ष तयारी आहे हे तपासून लसीकरण वाढविण्यात येईल. दररोज ३ लाखांपर्यंत लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
राज्यात लसीकरण प्रमाण चांगले, मात्र आणखी प्रमाण वाढवा
लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राचे काम समाधानकारक आहे असे आज सादरीकरणाच्या दरम्यान आरोग्य सचिवांनी सांगितले. महाराष्ट्रात आज सरासरी प्रत्येक दिवशी १ लाख ३८ हजार ९५७ डोस देण्यात येतात. इतर काही प्रमुख राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण समाधानकारक आहे मात्र ते आणखीही वाढवावे असे सांगण्यात
आले. राज्यात आजमितीस ३५ लाख ५२ हजार डोसेस देण्यात आले असून ३१ लाख ३८ हजार ४६३ डोसेस उपलब्ध आहेत. दररोज ३ लाख डोसेस दिल्यास १० दिवसांचा साठा असून तो अधिक वाढवून मिळावा अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली .
अचानक संसर्ग वाढीवर मार्गदर्शन मिळावे
महाराष्ट्राने वेळोवेळी केंद्रीय पथकांनी दिलेले सल्ले व मार्गदर्शन याप्रमाणे कोविडची लढाई लढली आहे. मधल्या काही काळात तर दिवसाला २ हजार रुग्णांपेक्षाही कमी रुग्ण आढळायला सुरुवात झाली होती मात्र आता काही जिल्ह्यांत ती संख्या खूप वेगाने वाढते आहे. महाराष्ट्र किंवा देशाच्या पश्चिमी भागातील राज्यांत अचानक झालेली ही मोठी वाढ संभ्रमात टाकणारी असून याविषयी तज्ञ, संशोधक यांनी प्रकाश टाकावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केली. विषाणूचे हे कुठले म्युटेशन किंवा आणखी काही प्रकार आहे का याविषयी मार्गदर्शन व्हावे असेही त्यांनी पंतप्रधानांना सांगितले.
४५ वयापुढील सर्वाना लस देण्याची विनंती
पंतप्रधानांनी यावर जगातल्या कानाकोपऱ्यातील सर्वच देशांत वैज्ञानिक यासंदर्भात बारकाईने लक्ष ठेवून असून या बदलाचा अभ्यास करीत आहेत असे उत्तर दिले. लसीचे दोन डोस घेतल्यावरही विशिष्ट कालावधी उलटून गेल्यावर कोरोना झाल्याच्या काही घटना मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणल्या तसेच राज्यात पुढील काळात आम्ही मोठ्या प्रमाणावर लसीकरण आणि त्याजोडीनेच मास्क वापरत राहणे, सुरक्षित अंतर ठेवणे या आरोग्याच्या नियमांवर जास्तीत जास्त भर देणार आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले. बाधितांमध्ये तरुण गट पण आहे हे लक्षात घेऊन ४५ वर्षे वयोगटापासून पुढे सहव्याधी असो किंवा नसो, सर्वाना लसीकरण करावे अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button