महिला उत्तम उद्योजक असतात, हे त्यांनी सिद्ध करून दाखविलं आहे, -जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले – गावडे
आज सर्वच क्षेत्रात महिला पुढे आहेत. गृहिणीपद सांभाळतानाच त्या व्यवसायातही पुढे येत आहेत. महिला उत्तम उद्योजक असतात, हे त्यांनी सिद्ध करून दाखविलं आहे, असे गाैरवोद्गार जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले – गावडे यांनी काढले. रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे शहरातील जे. के. फाईल्स येथील साई मंगल कार्यालयात महिला बचत गट आणि इतर उद्योगिनी महिलांसाठी आयोजित प्रदर्शन आणि विक्री उपक्रमाच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर या उपक्रमाच्या संयोजिका प्राची शिंदे, आसावरी शेट्ये, नाचणेचे माजी सरपंच संतोष सावंत आणि राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन चव्हाण उपस्थित होते. डाॅ. फुले यांनी कोरोनाच्या काळातही या प्रदर्शनाचे उत्तम नियोजन करून आयोजन करून उद्योगिनी महिलांना व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल त्यांचे काैतुक केले. तसेच राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे यांच्या कार्याची प्रशंसा करताना जिल्हा रूग्णालयाला होणाऱ्या त्यांच्या सहकार्याबद्दल शब्दच नसल्याचे सांगितले. तसेच संतोष सावंत यांच्या कार्याचाही त्यांनी गाैरव केला. कोरोनाने माणसांना खूप काही शिकवलं असल्याचं सांगून त्यांनी काेरोनाविषयी माहिती देतानाच महिलांनी व्यवसाय करतानाच खबरदारी घेऊन पुढे जावे, असे त्या म्हणाल्या.
सचिन शिंदे यांनीही प्राची शिंदे यांच्या या उपक्रमाचे काैतुक करताना अतिथी असलेल्या डाॅ. फुले यांच्या कोरोना काळातील अथक कार्याचा गाैरव केला. प्रास्ताविकात प्राची शिंदे यांनी रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या या प्रदर्शन व विक्री मागचा उद्देश विशद केला. कोरोना काळात सर्व आर्थिक व्यवहार थांबल्याने महिलांच्या या व्यवसायाला या माध्यमातून गती देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे निवेदन पुर्णिमा साठे यांनी केले.
या प्रदर्शनात रत्नागिरी तालुका तसेच चिपळूण आदी ठिकाणाहून महिला बचत गट तसेच महिला उद्योगिनी यांचे सुमारे ४५ स्टाॅल्स आहेत. यात विविध घरगुती उत्पादने, कोकण मेवा, खाद्य पदार्थ, साड्या, तयार कपडे, साैंदर्य प्रसाधने, ज्वेलरी, पर्सेस, लखनवी, ब्रॅडेड अगरबत्ती, आकर्षक झाडे, मातीची भांडी आदींचा समावेश आहे.
हे प्रदर्शन १६ मार्चपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत सुरू रहाणार आहे. प्रदर्शन आणि विक्रीबरोबरच या कालावधीत महिलांसाठी फनीगेम्स, पाक कला स्पर्धा, वेषभुषा स्पर्धा, आरोग्य तपासणी आदींचे आयोजनही करण्यात आले आहे.
रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे साई मंगल कार्यालयात महिला बचत गट आणि इतर उद्योगिनी महिलांसाठी आयोजित केलेल्या या प्रदर्शनाला सुप्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले यांनी भेट दिली व या उपक्रमाचे कौतुक केले ग्राहक पेठेच्या वतीने प्राची शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले
www.konkantoday.com