
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण नगर परिषदेच्या ताब्यात येणार?
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे महत्वाचे शीळ धरण रत्नागिरी नगर परिषदेच्या ताब्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या हे धरण जलसंपदा विभागाच्या मालकीचे असून ते हस्तांतरित करण्याबाबत पालकमंत्री उदय सामंत विशेष प्रयत्न करत आहेत. रद्द झालेली ही बैठक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री उदय सामंत आणि रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या उपस्थितीत लवकरच होणार असून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
यासंदर्भात मुंबई मंत्रालयात नुकतीच महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या बीड दौर्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली होती. या धरणाच्या देखभालीसाठी जलसंपदा विभागाने आतापर्यंत सुमारे १९ कोटी रुपये खर्च केले आहेत. यात २ वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे खचलेल्या धरणाच्या सांडव्याच्या बाजूचा भाग बळकट करण्यासाठी १४ कोटी रुपये खर्चुन संरक्षक भिंत बांधण्याचा खर्चही समाविष्ट आहे. ही सर्व थकिंत रक्कम नगर परिषदेने जलसंपदा विभागाला द्यावी, अशी मागणी जलसंपदा विभागाने केली आहे.
..तर पाणीपुरवठा सुरळीत होईल शीळ धरण नगर परिषदेच्या ताब्यात आल्यास न.प.चे धरणावर पूर्ण नियंत्रण येईल व भविष्यात शहराचा पाणीपुरवठा अधिक सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
www.konkantoday.com




