
खेड तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्याप कोरोना लसीकरणाला सुरवातच नाही; आमदारांच्या आढावा बैठकीत ही गंभीर बाब उघड
खेड : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लसीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र खेड तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्याप लसीकरणाला सुरवातच झाली नसल्याची गंभीर बाब आज आमदार योगेश कदम यांनी घेतलेल्या आढावा बैठकीदरम्यान समोर आली. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अतिशय गंभीर असल्याने आमदार योगेश कदम यांनी तालुका आरोग्य अधिकार्याना चांगलेच धारेवर धरले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि तोडांवर आलेला शिमगोत्सव या पार्श्वभुमीवर दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी आज येथील तहसिल कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी तालुका वैद्यकिय अधिकारी यांना तालुक्यात सुरु असलेल्या लसीकरणाला कशाप्रकारे प्रतिसाद मिळत आहे असे विचारले असता; तालुक्यातील आंबवली (जेथे गेल्या महिन्यात तब्बल ९० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते) शिव, तळे आणि जामगे या चार प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अद्याप लसीकरणाला सुरवातच झाली नसल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ राजन शेळके यांनी सांगितले.
ही बाब अतिशय गंभीर असल्याने आमदार योगेश कदम यांनी तालुका अधिकाऱ्यांना धारेवर धरत याचे कारण विचारले असता, इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने या ठिकाणी लसीकरणाला सुरवात करणे शक्य नसल्याची लंगडी सबब डॉ राजन शेळके यांनी सांगून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदार कदम यांनी लसीकरणाचे अन्य पर्याय सुचवून; हे पर्याय का वापरले नाही? असे विचारले असता
तालुका अधिकारी डॉ शेळके निरुत्तर झाले.
शिमगोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कोरोना लसीकरण मोहिम प्राधान्याने राबविणे गरजेचे असून याबाबत तालुका आरोग्य विभागाने याचा गांभिर्याने विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणत्याही सबबी न सांगता शिमगोत्सवापुर्वी संपुर्ण तालुक्यात कोरोना लसीकरण पुर्ण करावे तसेच लसीकरणादरम्यान काही समस्या असतील तर त्याबाबतही माहिती द्यावी अशा सुचना त्यांनी आरोग्य विभागाला केल्या.
www.konkantoday.com