
देवरूखच्या गोकुळ बालगृहातील आगळा गणेशोत्सव
देवरूख: देवरूख येथील मातृमंदिर संस्थेच्या गोकुळ या मुलींच्या बालगृहात दीड दिवसाच्या गणरायाची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली. गोकुळ बालगृहातील मुली मातृमंदिर संस्थेच्या अधिपत्याखाली असून या मुलींना शिक्षणाबरोबरच विविध व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. यामुळे या बालगृहातील मुली खेळात तसेच अन्य कलांमध्ये आपले कलाकौशल्य दाखवत असतात. या मुलींना ज्ञान मिळावे म्हणून या ठिकाणी वाचनालयही सुरू करण्यात आले आहे. दरवर्षी या ठिकाणी दीड दिवसाचा गणेशोत्सवही साजरा केला जातो. या निमित्ताने पुजा, आरती आदी कार्यक्रमाबरोबरच फुगड्यांसारखे कार्यक्रमही सादर केले जातात. विशेष म्हणजे या बालगृहात बसवण्यात येणारी गणेशाची मूर्ती येथील मुली स्वतःच तयार करतात. व त्याला रंगरंगोटीचे कुशलकामही ते सहजगत्या पार पाडतात. याच मूर्तीची येथे प्रतिष्ठापना केली जाते. मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी गोकुळच्या अधिक्षक वर्षा कांबळी तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंकिता चौगुले यांच्यासह कर्मचारी वर्ग जातीने या सोहळ्यात सहभागी होतो.
www.konkantoday.com
_______________________
कोकण टुडे वर जाहिरातीसाठी संपर्क-९५०३९५५९५९