खेडच्या बहुचर्चित पोलीस निरिक्षक सुवर्णा पत्की यांची अखेर बदली
खेड : खेड पोलीस स्थानकाचा चार्ज घेतल्यापासून या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिलेल्या खेडच्या पोलीस निरिक्षक सुवर्णा पत्की यांची अखेर रायगड येथे बदली करण्यात आली आहे. सुवर्णा पत्की यांच्या विरोधात माजी पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते रामदास कदम यांनी विधान परिषदेत आवाज उठवून त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची जोरदार मागणी केली होती.
दोन वर्षापुर्वी सुवर्णा पत्की यांनी खेड पोलीस स्थानकाचा चार्ज घेतला होता. तिथपासूनच त्या या ना त्या कारणाने चर्चेचा विषय ठरत आल्या होत्या. काही दिवसांपुर्वी खेड येथील गोळीबार मैदानावर मनसेने आयोजीत केलेल्या नगराध्यक्ष चषक या क्रिकेट सामन्यांच्या बॅनरवर त्यांचा फोटो झळकला आणि त्यांच्या विरोधात पुन्हा वातावरण तापू लागले. शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे आमदार रामदास कदम यांनी या बाबत सभागृहात छायाचित्रांकित पुरावे सादर करून खेडच्या सुवर्णा पत्की या शासकीय अधिकारी आहेत की कोणत्या पक्षाच्या पदाधिकारी? असा प्रश्न उपस्थित केला. शिवाय कोरोनाचा संसर्ग वाढत असताना खेडमध्ये क्रिकेट सामन्यांना परवानगी कशी दिली गेली. ज्या गोळीबार मैदानात क्रिकेटचे सामने रंगले होते त्या ठिकाणी हजारो प्रेक्षक होते. कोणाच्याही तोंडाला मास्क नव्हता, सामाजिक अंतर पाळले जात नव्हते. या गर्दीत पोलीस निरिक्षक सुवर्णा पत्की या देखील प्रमुख पाहुण्या म्हणून व्यासपिठावर उपस्थित होत्या.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील मंदीर, शाळा बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. लग्न समारंभालाही ५० पेक्षा जास्त व-हाड्यांना परवानगी नाही. असे असताना क्रिकेटच्या मैदानावर हजारो लोक जमले कसे? त्यांच्या तोंडाला मास्क नसताना पोलीस निरिक्षक सुवर्णा पत्की यांनी त्यांच्यावर कारवाई का केली नाही? असे प्रश्न उपस्थित करून रामदास कदम यांनी त्यांची
जिल्ह्याबाहेर बदली करून त्यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्या वेळी गृहमंत्री अनील देशमुख यांनी सुवर्णा पत्की यांची तात्काळ जिल्ह्याबाहेर बदली करून त्यांची चौकशी करण्यात येईल असे सांगितले होते.
गृहमंत्री देशमुख यांनी पत्की यांच्या बदलीचे संकेत दिल्यानंतर खेडमध्ये मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या निर्णयाला विरोध केला होता. राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या नफीसा परकार यांनी तर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून गृहमंत्र्याचा निर्णय कसा चुकीचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या
महिला आघाडीनेही उपविभागीय पोलीस अधिकारी काशीद यांची भेट घेऊन खेडच्या पोलीस निरिक्षक सुवर्णा पत्की यांची बदली झाल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा दिला होता.
पोलीस निरिक्षक सुवर्णा पत्की यांच्या बदलीला खेडमधून झालेल्या विरोधामुळे त्यांच्या बदलीचे काय होणार? याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. मात्र अखेर सुवर्णा पत्की यांच्या बदलीचे आदेश निघाले आणि गेली दोन वर्षे खेडच्या लेडी सिंघम म्हणून चर्चेत राहिलेल्या सुवर्णा पत्की यांच्या बदली प्रकरणाला पुर्णविराम मिळाला.
www.konkantoday.com