
रत्नागिरी तालुक्यातील चांदराई प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण , संशयिता विरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी तालुक्यातील चांदराई प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी संशयित सुशांत प्रकाश कांबळे (२३, रा. गव्हाणे, ता. लांजा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सुशांत कांबळे हा १ जून २०२५ ला सायंकाळी आपल्या मित्राला दुखापत झाल्याने उपचारासाठी चांदराई प्राथमिक आरोग्य केंद्रात आला होता. याठिकाणी कार्यरत असलेल्या डॉ. मोरे यांनी सुशांत याच्या मित्रावर उपचार करण्यास सुरुवात
केली. सुशांत याने यावेळी डॉ. मोरे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचा राग मनात ठेवून सुशांत याने डॉ. मोरे यांना हाताच्या थापटाने मारहाण केली. दरम्यान, डॉक्टरांना मारहाण झाल्याचा प्रकार समजताच चांदेराई येथील ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रात धाव घेत डॉ. मोरे यांना धीर दिला. दरम्यान, डॉ. मोरे यांनी मारहाण प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी सुशांत याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.