
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मदिनानिमित्त गणेशगुळे येथे ‘जयजयकार’ कार्यक्रमाचे आयोजन
रत्नागिरी: आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या १४० व्या जन्मदिनाचे (४ नोव्हेंबर) औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथील फडकेवाडीत राष्ट्र सेविका समिति आणि रेणुका प्रतिष्ठान रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जयजयकार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फडके यांचे मूळ गाव असलेल्या गणेशगुळे येथे सायंकाळी ४ वाजता हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला राष्ट्र सेविका समितिच्या कोकण प्रांत समिती प्रचारक वैशालीताई भागवत यांची विशेष उपस्थिती लाभली. आपल्या विचारांनी आणि कार्यामुळे अनेकांना प्रेरणा देणाऱ्या वैशालीताई भागवत या इंजिनिअर असून, नोकरीचा त्याग करून गेल्या सात वर्षांपासून त्या प्रचारिका म्हणून समितीचे कार्य निष्ठेने करत आहेत.
यावेळी अपूर्वा मराठे (कोकण प्रांत संपर्क टोळी सदस्य) आणि सरिताताई सोलकर (दक्षिण रत्नागिरी जिल्हा सह कार्यवाहिका) या प्रमुख कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती.
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सर्वप्रथम सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला होता आणि त्यांना ‘भारतीय सशस्त्र बंडाचे जनक’ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या मूळ गावी, समितीच्या वतीने आयोजित या ‘जयजयकार’ कार्यक्रमातून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यात आली आणि उपस्थित महिला व नागरिकांना राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळाली.




