
उक्षी परिसरात नदीपात्रात साचलेला गाळ उपसा,नदीपात्र गाळाने भरल्याने अनेक समस्या!
गाव विकास समिती व उक्षी स्थानिक ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकारी यांची भेट
नदीत गाळ मोठ्या प्रमाणावर साचल्याने नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन उक्षी व परिसरातील बावनदी पात्रातील गाळ उपसण्यात यावा अशी मागणी गाव विकास समितीच्या शिष्टमंडळासोबत उक्षी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की,रत्नागिरी तालुक्यातील उक्षी हे गाव बाव नदीच्या किनारी वसलेले गाव आहे. बाव नदी ही रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रमुख नदी असून त्याच बरोबर मानसकोंड, वांद्री, परचुरी, करबुडे, लाजुळ, पवार कोंड ही संगमेश्वर व रत्नागिरी तालुक्यातील अन्य गावेही या नदीच्या किनारी वसलेली आहेत. वाढणारे नागरीकरण, रेल्वे, रस्ते यांसारखी झालेली कामे व सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले मुंबई गोवा महामार्गाचे रुंदीकरणाचे काम. यामुळे नदी पात्रामध्ये मोठया प्रमाणावर गाळ साचला आहे. त्यातच गेल्या ६० ते ७० वर्षात या नदी पात्रातील गाळ उपसा न झाल्याने, नदी पात्रामध्ये शेरणी, धुड, जांभूळ यांसारख्या झुडूप वर्गीय वनस्पतीं बरोबरच मोठ मोठे वृक्ष वाढलेले असल्याकडे गाव विकास समितीच्या पदाधिकारी यांनी लक्ष वेधले आहे.
यामुळे दिवसेंदिवस पाण्याच्या प्रवाहाला विरोध होऊन नदी पात्रातील गाळ दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नदी पात्र उथळ बनत चालले आहे. तसेच साचलेल्या गाळामुळे नदी आपला मूळ प्रवाह बदलत असल्याचे देखील या निवेदनात म्हटले आहे.
पावसाळ्यात आपल्या भागात मुसळधार पडणारा पाऊस व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर येणारे पुराचे पाणी आजूबाजूच्या भागात घुसते. सतत येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे या भागातील सुमारे ५० ते ६० एकर शेती जमीन नापीक झाली आहे. जवळच खाडी असल्याने पुराचे पाणी लवकर ओसरत नाही. त्यामुळे वीज यंत्रणा, वाहतूक व्यवस्था कोलमडून या भागाचा संपर्क तुटतो. ८-८, १०-१० दिवस या भागात वीज नसते. अपरात्री पडणारा पाऊस व त्यामुळे येणारे पाणी हे वाडी वस्ती मध्ये घुसते. त्यामुळे जीवित हानी ही होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. रात्री अपरात्री पाऊस पडायला सुरुवात झाली की या भागातील लोक जीव मुठीत धरून बसतात. केव्हा पुराचे पाणी येईल आणि आपल्याला घरदार सोडावे लागेल हे सांगता येत नाही. सतत येणाऱ्या पुराच्या पाण्याने शेती वाहून जात असल्याने लोकांनी शेती करणे सोडून दिले आहे. त्यामुळे या भागातील लोकांचे उपजीविकेचे साधन नष्ट झाले आहे. तरी या सर्व गोष्टींचा योग्य तो विचार करून सप्तलिंगी नदी ते मानस कोंड या भागातील बावनदी पात्रातील गाळ उपसा करून या भागातील लोकांना पुराच्या पाण्याचा होणारा त्रास कायमचा दूर करावा अशी मागणी गाव विकास समितीचे जिल्हा सरचिटणीस डॉ.श्री.मंगेश कांगणे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री.शामकर्ण भोपळकर,
सौ.दिक्षा खंडागळे, महिला अध्यक्षा, रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष श्री.मुझम्मील काझी व उक्षी ग्रामस्थांच्या वतीने जमातुल मुसलिमीनचे अध्यक्ष श्री.ईक्बाल राजापकर,जमातुल मुसलिमीनचे सेक्रेटरी श्री.मुकत्यार काझी,जमात मेंबर अब्दुल मुनाफ खतीब यांनी केली आहे.
www.konkantoday.com