
मुंबई-गोवा महामार्गावर सावंतवाडीजवळ मळगाव येथे अपघात; गुजरातचे ५ पर्यटक जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सने डंपरला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला.यामध्ये गुजरातमधील एकाच कुटुंबातील पाच पर्यटकांसह ट्रॅव्हल्सचा चालक गंभीर जखमी झाला आहे. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या समजते.
डंपरची दोन्ही चाके तुटून रस्त्यावर पडली, तर टेम्पो ट्रॅव्हल्स रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली. यामुळे ट्रॅव्हल्सच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. मळगाव जोशी-मांजरेकरवाडी परिसरात ही घटना घडली.अपघातात जखमी झालेल्यांमध्ये मयूर मालविय (वय ३५), समीक्षा मालविय (वय ३२), चंद्रिका मालविय (वय ३७), बन्सी मालविय (वय २१), हित मालवीय (वय १०) आणि किरीट मालविय (वय ४२) या गुजरात येथील पर्यटकांचा समावेश आहे. टेम्पो ट्रॅव्हल्सचा चालक विजयकुमार झापडी (वय ३५) हा गंभीर जखमी झाला आहे.