रत्नागिरी नगर परिषदेचे शिलकी अंदाजपत्रक, नागरिकांवर एकही रुपयाच्या कराचा बोजा नाही
रत्नागिरी नगर परिषदेच्या २०२०-२१ च्या २५ लाख ९३ हजार ६३६ रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकास गुरुवारच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. १६३ कोटी ४९ लाख रुपये जमेचे आणि १४० कोटी ३७ लाख रुपये खर्चाचे हे अंदाजपत्रक आहे. कोरोनावर आधीच कोट्यवधीचा खर्च झाला आहे. त्यात करवसुली जेमतेम ४० टक्केच असताना एक रुपयाचीही करवाढ केली नसल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. त्याचबरोबर रनपची नवीन भाजी मार्केट इमारत जीर्ण होऊन पूर्णपणे धोकादायक झाल्याने ती पाडून तेथे नवीन इमारत बांधण्यासही या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे.
पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली.पहिल्या अंदाजपत्रकीय बैठकीत २५लाख ९३ हजार ६३६ रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. या अंदाजपत्रकीय बैठकीत माहिती देताना नगराध्यक्ष साळवी म्हणाले की, गेल्यावर्षीच्या आर्थिक वर्षात कोरोना संकट आले. आता पुन्हा त्याच कालावधीत हे संकट घोंगावू लागले आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी रनपने कोट्यवधी रुपये खर्च करून उपाययोजना केल्या आहेत. त्याचवेळी वेगवेगळ्या करांची वसुलीही कोरोना संकटामुळे अपेक्षित प्रमाणात होऊ शकलेली नाही. तरीही एकही रुपया कराचा बोजा लादण्यात आला नसल्याचे नगराध्यक्षांनी सभेवेळी सांगितले. हा मंजूर अर्थसंकल्प जिल्हाधिकार्यांच्या मंजुरीसाठी पाठवण्याचाही ठराव करण्यात आला.
www.konkantoday.com