राधाकृष्ण कलामंचचे रौप्यमहोत्सवी वर्ष!पहिला कार्यक्रम होणार शनिवारी स्वा. सावरकर नाट्यगृहात
पं. जितेंद्र अभिषेकी यांचा जीवनपट संगीतातून उलगडणार
रत्नागिरी- कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर पडताना आता हळुहळु सांस्कृतिक क्षेत्र स्थिरावत आहे. रत्नागिरीतील राधाकृष्ण कलामंचने संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त या वर्षी विविध उपक्रम घेणार असल्याची घोषणा केली. यात पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या सांगीतिक जीवनपटाचा परामर्ष घेणारा ‘रंध्रात पेरली’ हा पहिला कार्यक्रम येत्या शनिवारी (ता. 13) सायंकाळी 7 वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात रंगणार आहे.
या कार्यक्रमात प्रसिद्ध ज्येष्ठ गायक राजाभाऊ शेंबेकर गायन करणार असून त्यांना हेरंब जोगळेकर, वरद सोहोनी, हरेश केळकर वाद्यसाथ करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन धनंजय चितळे करणार आहेत. वर्षभर नावीन्यपूर्ण कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यासंदर्भात राधाकृष्ण कलामंचचे अध्यक्ष विनित घाणेकर, सचिव मोहन बापट, सहसचिव मिलिंद टिकेकर, खजिनदार विनायक जोशी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी आनंद पाटणकर, महेंद्र पाटणकर आणि प्रशांत साखळकर उपस्थित होते. शासनाचे कोरोनाविषयक नियम पाळून हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी नाट्यगृहात जंतुनाशक फवारणी केली आहे. नाट्यगृहामध्ये पन्नास टक्के आसनक्षमतेमध्ये कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती संस्थेने दिली. मास्क व सॅनिटायझरचा वापर अत्यावश्यक आहे.
रत्नागिरीच्या सांस्कृतिक क्षेत्रात, रसिकांच्या हृदयात सातत्याने अनेक वर्ष स्वतःचं स्थान अढळ ठेवणार्या राधाकृष्ण कलामंच या संस्थेचं हे रौप्यमहोत्सवी वर्ष. राधाकृष्ण कलामंच अर्थात आरके. म्हणजे नाविन्यता, कल्पकता, अभिनवता, अभिजातता आणि अर्थातच अत्युच्चता…!! हे समिकरणच आहे आणि रसिकांनी ते आपल्या हदयस्थ कायमच जतन केले आहे.
या संस्थेची स्थापना सन 1996 मध्ये झाली असली तरी या संस्थेचा पाया त्या आधी साधारण 16 वर्ष मागे 1980 मध्ये राधाकृष्ण मंदीरात, राधाकृष्ण वैश्य संस्थेच्या प्रोत्साहनाने घातला गेला. भालबा केळकर यांच्या विचारांनी व संस्कारांनी भारलेल्या प्रा. विजयकुमार रानडे यांनी या नाट्यसंस्कारांची मुहूर्तमेढ रोवली. सरांनी मुलांमध्ये नाविन्यपूर्ण विचार करण्याची प्रकीया, नाट्यविषयक नवनवे आयाम, दृष्टी, सजगता, कल्पनाशक्तीचा विकास अशा अनेक मूल्यांचे रोपण केले. त्या जोरावर छोटे मोठे रंगमंचीय अविष्कार राधाकृष्ण मंदीराच्या रंगमंचावर साकारत संस्थेचे सदस्य घडत गेले. 1996 च्या दरम्यान राधाकृष्ण वैश्य संस्थेच्या प्रोत्साहनातून राधाकृष्ण कलामंच अशा स्वतंत्र अस्तित्वाने हा नाट्याभ्यासी ग्रुप रत्नागिरीच्या सांस्कृतिक क्षेत्रात उभा राहिला.
संस्था विविध एकांकीका स्पर्धा, नाट्य स्पर्धांमध्ये आपले कौशल्य सिद्ध करू लागला. चटाटो, निवडूंग, वाडा विकायचाय, छू मंतर, टूर- टूर, समांतर, चाहूल, सेतू असे अनेक गद्य रंगमंचीय आविष्कार साकारून गद्यरंगभूमीचे कलाकार अशी आपली ओळख रसिकांचे मनावर ठसवण्यात कलामंच सातत्याने यशस्वी होत मोठा होत होता. विविध नाट्यस्पर्धा जिंकत होता.
गद्य नाट्यकृतीबरोबरच कलामंचने संगीत रंगभूमीवरही आपला दमदार ठसा उमटवला आहे. सं.पंडीतराज जगन्नाथ आणि सं. मंदारमाला या नाटकांनी राज्य नाट्यस्पर्धबरोबर दिल्ली येथील बृहन्महाराष्ट्र संगीत नाट्यस्पर्धा गाजवून बक्षिसांची लयलूट केली. नाट्यनिर्मिती, एकांकीका निर्मिती एवढयावरच न थांबता सुमारे 11 वर्ष पाऊलखुणा या नावाने अभिजात शास्त्रीय संगीत शिकणार्याच मुलांच्या शास्त्रीय गायन स्पर्धेचे आयोजन करून भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत व त्याचा वारसा जपण्याचे काम केले आहे.
राधाकृष्ण कलामंचने कायमच नव्या जुन्याचा संगम साधण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला आहे. नाट्यकलेचे हे असिधारा व्रत पुढच्या पिढीकडे संक्रमित करताना, कलामंचच्या अभिनवता या गुणाचे जतन कसे होईल हे पाहिले आहे. सं. ययाति देवयानी, सं. स्वयंवर, सं. सुवर्णतुला, सं. स्वरसम्राज्ञी, सं. संत गोरा कुंभार या दर्जेदार कलाकृती सादर करून रत्नागिरीसह अवघ्या महाराष्ट्रातील चोखंदळ रसिकांच्या मनात प्रेमाचे, आदराचे, अढळ स्थान निर्माण केले आहे.
गीतरामायण, राम रंग शाम संग, स्मृति ठेवूनी जाती, अभंगरंग, गाणारं व्हायोलिन, रसिक मनोहर विद्याधर, कभी तनहाई यों मे…. (संगीतकार स्नेहल भाटकर स्मृति) असे आगळेवेगळे विषय घेऊन सुरेल वाद्यवृंदाचे रंगमंचीय आविष्कार सादर करून रसिकांची कायमस्वरूपी जिंकण्याचे कसब राधाकृष्ण कलामंचने साधले आहे.
रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून काही उपक्रम रसिकांसाठी वर्षभर आयोजित करण्याचा मानस आहे. कार्यक्रमांसाठी रसिकांनी उदंड प्रतिसाद द्यावा आणि कलामंचवरील आपला स्नेह दृढ करावा, असे आवाहन राधाकृष्ण कलामंचच्या वतीने करण्यात आले आहे.
www.konkantoday.com