…. तर नीलेश राणेंसाठी भारतीय जनता युवा मोर्चा रस्त्यावर उतरणार- भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन
रत्नागिरी ः भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार आणि कोकणचे नेते नीलेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्यावर खासदार विनायक राऊत यांच्याकडून वाट्टेल ते आरोप केले जात आहेत. त्यांच्या आरोपांना आम्ही जशास तसेच उत्तर देऊच. पण वेळ आली तर राणेंसाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असा इशारा भाजयुमोेचे द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी दिला.
यापूर्वी सेना पदाधिकार्यांनी कोकण प्रभारी, माजी आमदार प्रमोद जठार यांनाही रत्नागिरीत फिरकू देणार नाही, असा इशारा दिला होता.पण त्यानंतर जठार यांचे चार दौरे झाले. त्यामुळे सेना नेत्यांनी फिरकू देणार नाही, अशी दमबाजी करू नये. त्यामुळे प्रदेश सचिव नीलेश राणे यांच्याबाबत केलेल्या विधानाला काही अर्थ नाही. नीलेश राणे रत्नागिरीत आल्यावर आम्ही त्यांच्यासोबत संरक्षणासाठी आहोत, वेळ आली तर रस्त्यावरही उतरू, असा इशारा अनिकेत पटवर्धन यांनी दिला.
खासदार राऊत यांनी उगाचच सुरवात केली असून आता त्यांनीच हा विषय थांबवावा, असेही सूचक विधान पटवर्धन यांनी केले आहे. सिंधुदुर्ग येथे खासदार राणे यांच्या लाईफटाईम रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी कोणीही टिका केली नव्हती. तरीही खासदार राऊत यांनी खासदार नारायणराव राणे यांच्यावर टीका केली. ज्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी खासदार नारायणराव राणे यांना मुख्यमंत्री बनवले त्यावेळी कोणीही टीका केली नाही. खासदार राणे हे कोकणचे खरे नेते असून त्यांचा सर्व विषयांचा अभ्यास आहे. उलट त्यांनी सुरू केलेल्या रुग्णालयाचे कौतुक सेनेने करायला हवे होते. पण उगाचच टीका करून सेनेने आपली पात्रता दाखवली.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे 40 सरपंच, उपसरपंच आणि 493 ग्रामपंचायत सदस्य निवडून आले. प्रदेश सचिव नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची जोमाने वाढ होत असल्याचेच हे सूचक आहे. कोकणचे नेते रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन, नीलेश राणे यांचे नेतृत्व यामुळे आगामी सर्व निवडणुकांमध्ये कमळ फुलणार आहे, असा दावा अनिकेत पटवर्धन यांनी केला.
रोजगाराच्या प्रश्नावर शिवसेनेने काय केले? हा खरा प्रश्न आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नाणार रिफायनरी प्रकल्प योग्य रितीने झाला असता. यातून लाखो कोकणी युवकांना रोजगार मिळाला असता. पण सेनेच्या अडेलतट्टूपणामुळे हा प्रकल्प गेला. आता कोकणात नीलेश राणे यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार मिळण्यासाठी भाजयुमोचा प्रयत्न सुरू असलल्याचे अनिकेत पटवर्धन यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com