
कुंभार्ली घाटातील दरड हटवली, वाहतूक सुरू
चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात मंगळवारी दुपारी 12 वाजता पुन्हा एकदा दरड कोसळली. सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा तत्काळ घटनास्थळी पोहोचल्यानंतर दरड हटविण्याचे काम सुरू झाले. यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र, सायंकाळी उशिराने या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसात कुंभार्ली घाटात दरड कोसळली होती. पुन्हा एकदा सोनपात्राजवळ दरड कोसळली आहे. दरडीसोबत मोठ मोठे दगड रस्त्यावर आल्याने हा मार्ग बंद झाला. याचवेळी रस्त्याच्या एका बाजूने एकेरी वाहतूक सुरू होती. मात्र, अवजड वाहने घाटमाथ्यावर व पायथ्यालगत थांबवून ठेवण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जेसीबी व अन्य यंत्रणा घाटात पोहोचली आणि दरड हटविण्याचे काम सुरू झाले. सायंकाळी उशिरा कुंभार्ली घाटातील वाहतूक सुरळीत झाली आहे.