
मंडणगड तालुक्यात आंबवणे येथे दरड कोसळून वाहतूक बंद
मंडणगड : पावसाने तालुक्यातील आंबवणे बुद्रुक रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद पडला होता. याठिकाणी तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन तत्काळ घटनास्थळी पोहोचले. सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे पथक व मंडणगड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दरड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. सोमवारी दुपारपर्यंत समर्थ नगर येथील काही घरांच्या संपर्क रस्त्यावर पाणी साचल्यामुळे सम्पर्क तुटला होता.
तालुक्यातील भारजा नदीमध्ये पावसामुळे क्षमतेपेक्षा अधिक पाणी वाढले होते. मंडणगड – मांदिवली मार्गावरील चिंचघर पुलावरून पाणी वाहत असल्याने संपर्क तुटून वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. त्या परिसरातील भात शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. तसेच कोंबळे येथील तिडे मोरीवरून पाणी वाहून जात असल्याने काही काळ वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. या ठिकाणी तहसीलदार दत्तात्रय बेर्डे यांनी जाऊन पाहणी केली.