
रत्नागिरी तालुका मंडप, लाईट, साउंड असोसिएशनचा आज सभासद मेळावा
रत्नागिरी तालुका मंडप, लाईट, साउंड असोसिएशनचा सभासद मेळावा आज (ता. 31) अंबर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये मंडप, लाईट, साउंड, इव्हेंट्स आणि केटरर्सच्या व्यवसायाची दशा व दिशा यावर चर्चासत्र होणार आहे. तालुक्यातील २२५ जण संघटनेचे सभासद झाले असून ते सर्वजण या वेळी उपस्थित राहणार आहेत.
कोरोना कालावधीत सर्वांच्याच व्यवसायाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आगामी काळात व्यवसायाचे बदलते स्वरूप, त्यातील आव्हाने यासंदर्भात एकत्र येण्याची सर्वांनाच गरज भासली. त्यातून संघटना तयार करण्यात आली आहे. ऑल महाराष्ट्र टेन्ट डिलर्स वेल्फेअर ऑर्गनायझेशन संलग्न रत्नागिरी जिल्हा मंडप, लाईट, साऊंड इव्हेंटस अँड केटरर्स असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याची संघटना तयार करण्यात आली. एकमेकांशी दरावरून स्पर्धा करण्यापेक्षा आपण सर्वांनी एकत्र येऊन चांगली सेवा ग्राहकांना देण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे व त्याकरिता योग्य दरसुद्धा ठरवला पाहिजे, असे संघटनेने ठरवले आहे.
प्रथमच मंडप व सर्व वरील सेवा देणार्यांनी एकत्र येऊन ही संघटना स्थापन केल्यामुळे तालुक्यातून उदंड प्रतिसाद लाभत आहे. याचा फायदा छोट्या मोठ्या व्यावसायिकांना मिळत आहे. उद्याच्या मेळाव्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष अमरेश सावंत, जिल्हा उपाध्यक्ष राजन कोकाटे, जिल्हा सचिव सुहास ठाकुरदेसाई मार्गदर्शन करणार आहेत.
मेळाव्यात १०.३०वाजता उद्घाटन, मान्यवरांचे स्वागत, सत्कार, ११ वाजता व्यवसायाची दशा व दिशा यावर चर्चासत्र, १२ वाजता सभासद प्रमाणपत्र ओळखपत्र वितरण केले जाणार आहे. दुपारी भोजन व नंतर अध्यक्षीय भाषणाने मेळाव्याची सांगता होणार आहे. या मेळाव्यातील सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन असोसिएशन अध्यक्ष्यानी केले आहे.
www.konkantoday.com