
कोसळलेल्या हेलिकॉप्टरमधू जखमींना बाहेर काढण्यासाठी एका हॉटेलमधील वेटर देवदूत ठरले
पुणे जिल्ह्यातील पौडजवळ आज हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरुप बचावले आहेत. हेलिकॉप्टर चालकाने प्रसंगावधान दाखवत येथील एका शेतात ते उतरवण्याचा प्रयत्न केल्याने इमर्जन्सी लँडींग शक्य झाले, पण ते हेलिकॉप्टर क्रॅश होऊन शेतात कोसळले. देव तारी, त्याला कोण मारी… या म्हणीचा प्रत्ययचं या हेलिकॉप्टर दुर्घटनेतून आला आहे. कारण, बघता बघता एका क्षणात हे हेलिकॉप्टर खाली कोसळले आणि त्याचा चेंदामेंदा झाला आहे. मात्र, सुदैवाने सर्वच प्रवासी बचावले आहेत. दरम्यान, या दुर्घटनेनंतर प्रशासनाने किंवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेण्यापूर्वी तेथील एका हॉटेलमधील वेटर देवदूत बनून घटनास्थळी पोहचले. घटनास्थळावरील हेलिकॉप्टरमधू जखमींना बाहेर काढून त्यांना सुरक्षीत ठिकाणी बसवले.जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील कोंढावळे गावात हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर गावालगत असलेल्या गारवा वाटाणे मळा या हॉटेलमधील सगळे वेटर्स हातातील काम टाकून पळत सुटले, त्यांनी थेट कुठलाही मागचा पुढचा विचार न करता घटनास्थळ गाठून दुर्घटनेतील चार जणांना वाचविण्यासाठी, त्यांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आयुष्याच्या संघर्षमय प्रवासात दररोज वेटर्सच काम करणारे ही सगळी मंडळी आज दुर्घटनेतील चार जणांसाठी देवदूत ठरले आहेत.