
उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय आपल्या विभागात : एक अभिनव उपक्रम दिनांक २५ जानेवारीपासून कोल्हापूरमधून उपक्रम सुरू
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षांचा आढावा घेण्यासाठी राज्यातील तेरा अकृषी विद्यापीठांचा दौरा केल्यानंतर हे लक्षात आले की, विद्यार्थ्यांशिवाय पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यापीठीय कर्मचारी, शैक्षणिक संस्था, यांचे प्रश्न विविध स्तरावर प्रलंबित आहेत. या बाबीचा विचार करून ‘ उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय आपल्या विभागात’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात दिनांक २५ जानेवारी २०२१ पासून कोल्हापूर मधून होत आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे सांगितले.
श्री. सामंत म्हणाले, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या संदर्भात असलेल्या अडचणींसाठी संचालक, सहसंचालक, विद्यापीठ, मंत्रालय व इतर कार्यालयात यावे लागते. विशेषतः आपल्या प्रश्नांसंदर्भात वारंवार विविध प्रशासकीय कार्यालयात भेट देऊन काही कारणांमुळे प्रलंबित असल्याने अनेकांचा वेळ, ऊर्जा व निधी खर्च होतो. अनेक विभागांत जाऊन अडीअडचणी मांडत त्या सोडविण्यापेक्षा उच्च व तंत्र विभागातील मंत्रालय व संचालक स्तरावरील अधिकाऱ्यांसमवेत विभागीय ठिकाणी सर्व संबंधित घटकांची भेट घेऊन प्रश्नांची तत्काळ सोडवणूक करण्यात येईल.
विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यापीठीय कर्मचारी, शैक्षणिक संस्था यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी राज्यातील प्रत्येक विभागनिहाय बैठका घेतल्या जाणार आहेत. याची सुरूवात कोल्हापूर विभागापासून होत आहे. सर्वांनी या बैठकीस येत असताना आवश्यक ती कागदपत्रे आणि आपल्या समस्याचे निवेदन घेऊन यावे, असे आवाहन श्री. सामंत यांनी केले.
श्री. सामंत म्हणाले, असा उपक्रम याआधी कधीही झालेला नसून सर्वांच्या अडचणी त्या – त्या ठिकाणी तत्काळ सोडविण्यासाठी या अभिनव उपक्रमाची सुरूवात होत आहे. आपल्या समस्यांसाठी मुंबईला येत असताना प्रवास, निवासाची व्यवस्था आणि यासाठी लागणारा वेळ यामुळे अनेकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सर्वांनी आपल्या प्रश्नांसाठी मंत्रालयात येण्यापेक्षा मंत्रालय आपल्या विभागात आले तर ते तत्काळ आपले प्रश्न सोडवू शकते.
श्री.सामंत म्हणाले, सोमवार दिनांक २५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता या अभिनव उपक्रमाची सुरुवात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून होत आहे. या अभिनव उपक्रमात अधिकाधिक विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यापीठीय कर्मचारी, शैक्षणिक संस्थांनी आपला सहभाग नोंदवून आपल्या अडचणी सोडवून घ्याव्यात.
प्रधान सचिव, आयुक्त राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, संचालक तंत्रशिक्षण संचालनालय, संचालक उच्च शिक्षण, संचालक कला संचालनालय, संचालक महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, संचालक ग्रंथालय संचालनालय, सह संचालक, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सर्व उच्चपदस्थ अधिकारी व कर्मचारी या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
श्री. सामंत म्हणाले, माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार अत्यंत चांगल्याप्रकारे कार्य करीत आहे. लोकाभिमुख कारभार करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असून सर्व दृष्टीकोनातून लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या अभिनव उपक्रमाची सुरुवात कोल्हापूर मधून होत असून पुढच्या विभागाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com