
माजी आमदार बाळ माने 56 वा वाढदिवस विशेष
माजी आमदार, भाजपा नेते तथा दि यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त सुरेंद्रनाथ यशवंत तथा बाळ माने यांचा आज 56 वा वाढदिवस आहे. केजी टू पीजीचे शिक्षण एकाच छताखाली मिळावे बाळ माने यांनी दि यश फाउंडेशनची स्थापना केली. दुर्गम आणि अत्यल्प आरोग्य सुविधा असणार्या रत्नागिरी जिल्ह्यात नर्सिंगच्या शिक्षणाची सुरवात बाळ माने यांनी 2006 मध्ये केली. कोरोना काळात रुग्ण बरे करण्यासाठी डॉक्टरांसमवेत नर्सिंग स्टाफचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. त्यामुळे नर्सिंग क्षेत्राला चांगले दिवस आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून येथे विद्यार्थिनी शिक्षणासाठी येत असून त्यांना कॉलेजच्या प्रशस्त आवारातच वसतीगृह बांधण्यात येणार आहे. त्याचे भूमीपूजन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, खासदार, कोकणचे नेते नारायणराव राणे यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमात बाळ माने यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला आहे. यानिमित्त……
माजी आमदार तथा बाळ माने यांनी आई शकुंतला आणि वडिल यशवंतराव माने यांच्या स्मरणार्थ दि यश फाउंडेशन संस्थेची 26 वर्षांपूर्वी स्थापना केली. माने यांचे कॉलेजचे शिक्षण सुरू असताना वडिलांचे निधन झाले. परंतु न डगमगता भाजप नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली माने यांनी राजकारणात प्रवेश केला. वडिल यशवंतराव हेसुद्धा समाजसेवक, मुरब्बी राजकारणी, शिक्षणतज्ञ होते. त्यांचा सामाजिक वारसा बाळ माने दि यश फाउंडेशनमार्फत पुढे नेला आहे. यशवंत प्राथमिक विद्यालय 1996, कै. यशवंतराव माने माध्यमिक विद्यालय 1997 आणि नर्सिंग कॉलेज अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना 2006 मध्ये केली.
महाविद्यालयात बेसिक बी. एस्सी, नर्सिंग अभ्यासक्रम सुरू असून ए. एन. एम. नर्सिंग (2008), जी. एन. एम. नर्सिंग (2011), पोस्ट बेसिक बी. एस्सी. नर्सिंग (2012), एम. एस्सी. नर्सिंग (2019) हे अभ्यासक्रमही सुरू झाले. बेसिक बीएस्सी, एएनएम, जीएनएम नर्सिंग या अभ्यासक्रमातून आतार्यंत 1500 हजारांहून अधिक विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. आतापर्यंत उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी शासकीय, खासगी सेवेत, शिक्षक, परिचारिका, ब्रदर्स, प्राचार्य, लेक्चरर्स, ट्यूटर आदी सेवेत कार्यरत आहेत. या सर्वांना चांगले वेतन दरमहा प्राप्त होते.
जिल्हा शासकीय रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालय, जि. प. या अंतर्गत येणार्या शासकीय कामात व कार्यक्रमात सहकार्य, सहभाग, रॅली, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृतीपर कार्यक्रमात नर्सिंगचे विद्यार्थी भाग घेतात. पोलिओ डोस कार्यक्रमातही विद्यार्थ्यांनी भाग घेतला. परिचारिका दिन, विद्यार्थी स्वागत, शपथविधी समारंभ, स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा हे उपक्रमही होतात. महाविद्यालयाच्या एनएसएस विभागातर्फे शिबिरांमध्ये श्रमदान, बंधारा बांधणी, वृक्षारोपण असे उपक्रम राबवले जातात.
नर्सिंग कॉलेजने आतापर्यंत विविध सामाजिक कार्यामध्ये योगदान दिले आहे. महिलांचे सक्षमीकरण, महिला क्रीडा स्पर्धांमध्ये भाग, सामाजिक सेवा, सुधारणा कार्य, रुग्णांची सेवा करण्याची संधी व प्रशिक्षण, महिला, विद्यार्थ्यांचा विकास साधला जातो. विविध कार्यक्रमातून स्वतःला सिद्ध करण्यास प्रोत्साहन व स्वबळावर उभे राहण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे संस्थापक बाळासाहेब माने यांनी संधी दिली. नर्सिंग कॉलेजचे आता वटवृक्षात रुपांतर होत आहे.

चौकट 1
दि यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजची वैशिष्ट्ये
*स्वतंत्र इमारत व वर्गखोल्या, चार हजार पुस्तके, नर्सिंग जर्नल्ससह अद्ययावत ग्रंथालय *प्रयोगशाळा, *फंडामेंटल लॅब *न्यूट्रीशन लॅब *कम्युनिटी *अॅनॉटॉमी *मिडवायफरी लॅब *क्वालिफाईड अध्यापक व ऑफिस स्टाफ, *बस सुविधा, *प्रात्यक्षिक शिक्षण सुविधा जि. प., शासकीय रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपलब्ध.
चौकट 2
बाळ माने हे भारतीय जनता युवा मोर्चा या युवा संघटनेतून पुढे आलेले नेतृत्व. वडिल कै. यशवंतराव, कै. तात्यासाहेब नातू, माजी आमदार शिवाजीराव गोताड, कुसुमताई अभ्यंकर यांचा यांचा राजकीय वारसा आणि डॉ. ज. शं. केळकर, डॉ. शांताराम केतकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांना समाजकारणाचे बाळकडू मिळाले. भाजपची स्थिती फारशी चांगली नसतानाही प्रवाहाच्या विरोधात पोहत जाऊन बाळ माने यांनी यश मिळवले. सकारात्मक वृत्ती, काळाप्रमाणे पुढे जाण्यासाठी नीती जनसामान्यांना आपलेसे वाटणारे हे व्यक्तीमत्व कमलपुष्पाप्रमाणे फुलून आले. सामान्य कार्यकर्ता ते पक्ष पदाधिकारी व आमदार हा प्रवास सहज सुकर नव्हता. चढउतार, कटू-गोड प्रसंग यातून त्यांनी वाटचाल केली आहे. रा. स्व. संघाच्या तालमीत तयार झालेल्या बाळ माने यांनी भाजपची बांधिलकी स्वीकारून, भाजपची तत्त्वप्रणाली, भाजपचे नेतृत्व यावर विश्वास ठेवून भाजपचे कार्य तळागाळात पोहोचवले. समाजाशी असलेली विकासाची नाळ बाळ माने यांनी कधीच तोडली नाही. रत्नागिरी तालुक्यास जिल्ह्यात विविध कार्यक्रम, बैठका, भेटीगाठींच्या माध्यमातून ते संवाद साधत असतात. सर्वांची आस्थेने चौकशी करून ते सर्वांना आपलेसे करतात.
चौकट 3
उपजत गुणांच्या जोरावर अनेक दिग्गजांचा सक्रिय पाठिंबा माने यांनी मिळवला आणि जनसामान्यांना आपलेसे वाटणारे हे व्यक्तिमत्त्व कमलपुष्पाप्रमाणे फुलून आले. बाळासाहेब माने यांचा स्वभाव आक्रमक असला तरी तितकाच दृष्टिकोन सकारात्मक असतो. जनसामान्यांमध्ये मिसळण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. यामुळेच आजही जिल्ह्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.
