
गुहागर तालुक्यातील नवानगर येथे क्रिकेट खेळण्याच्या क्षुल्लक वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला, आरोपीला अटक
गुहागर तालुक्यातील नवानगर येथे क्रिकेट खेळण्याच्या क्षुल्लक वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गुहागर पोलिसांनी या हल्ल्यातील आरोपीला घटनेच्या १२ तासांच्या आत अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नवानगर येथे सत्यजित पटेकर आणि ऋषिकेश नाटेकर यांच्यामध्ये क्रिकेट खेळताना किरकोळ वाद झाला होता. याच वादाचे पर्यवसान सायंकाळी साडेसातच्या सुमारास हाणामारीत झाले. नवानगरमधील भट्टीजवळील पुलावर ऋषिकेश नाटेकर, अभय पालशेतकर आणि अवधूत कोळथरकर गप्पा मारत बसले असताना, आरोपी सत्यजित पटेकर अचानक पाठीमागून आला आणि त्याने ऋषिकेशच्या पाठीत चाकूने वार केले. त्यानंतर त्याने पोटावरही वार करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या मित्रांनी त्याला पकडले.
आरोपी सत्यजित पटेकरने यावेळी, “तुम्ही मला अजून ओळखत नाही. याआधी सुद्धा मी खून केला आहे, त्यामुळे मला खून कसा करतात हे चांगले ठाऊक आहे,” असे म्हणत सर्वांना शिवीगाळ केली आणि घटनास्थळावरून पळ काढला.या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ऋषिकेशला तातडीने स्थानिकांनी अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील रुग्णालयात दाखल केले आहे.घटनेची माहिती मिळताच गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ आरोपीच्या शोधासाठी सापळा रचला आणि त्याला १२ तासांच्या आत अटक करण्यात यश मिळवले.सध्या आरोपी सत्यजित पटेकर गुहागर पोलिसांच्या ताब्यात असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.