महाराष्ट्रातील काही भागांमध्ये कोंबडय़ा आणि कावळे दगावल्याने राज्यावर ‘बर्ड फ्लू’चे सावट
केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांत ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचे केंद्र सरकारने रविवारी जाहीर केले. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये कोंबडय़ा आणि कावळे दगावल्याने राज्यावर या रोगाच्या साथीचे सावट आहे.
महाराष्ट्र आणि दिल्लीत मृतावस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे रविवारी केंद्रीय पशुपालन मंत्रालयाने स्पष्ट केले.
महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले नसले तरी लातूर जिल्ह्य़ाच्या अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथे ३५० कोंबडय़ा दगावल्याने भीतीचे वातावरण आहे.कोंबडय़ांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
www.konkantoday.com