रत्नागिरी जिल्ह्यात ग्रा.पं. निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व; बाळासाहेबांची शिवसेना दुसर्‍या स्थानावर

रत्नागिरी : जिल्ह्यातील 222 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचा भगवा फडकला आहे. 101 ग्रामपंचायतींवर त्यांनी वर्चस्व मिळवले आहे. खेड मतदार संघात योगेश कदम यांनी वर्चस्व राखले. तर रत्नागिरीत ना. उदय सामंत यांनी ठाकरे गटाला जेरीस आणले. गुहागर व राजापूरमध्ये आ. भास्कर जाधव व आ.राजन साळवी यांनी आपले वर्चस्व राखण्यात यश मिळवले आहे. चिपळूण मतदार संघातही ठाकरे गटाने राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे. तर जिल्ह्यात भाजपाने 19 ग्रा.पं. ताब्यात घेतल्या. शिवसेना ठाकरे गटाने 101 ग्रामपंचायतींवर तर शिंदे गटाने 45 ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. भाजपाने 19 ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या असून, राष्ट्रवादीच्या खात्यात 8 तर काँग्रेसने 3 वर वर्चस्व मिळवले आहे. गावपॅनलने 45 ठिकाणी वर्चस्व राखले.
दापोली-खेड-मंडणगड मतदार संघामध्ये 30 ग्रामपंचायती बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे आल्याचे बोलले जात आहे. यामध्ये दापोलीत 22 ग्रामपंचायती, मंडणगडमध्ये सहा तर खेडमध्ये दोनवर योगेश कदम यांनी वर्चस्व राखले. महाविकास आघाडीला या ठिकाणी मोठा फटका बसला आहे. गुहागर मतदार संघात  14 पैकी 8 वर ठाकरे गटाने निर्विवाद विजय मिळवला. तर भाजपला दोन, गाव विकास पॅनलला 3 तर महाविकास आघाडीला 1 ग्रामपंचायत जिंकता आली. उर्वरीत सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.
रत्नागिरीमध्ये   29 पैकी 23 साठी सरपंच तर 25 ग्रा.पं.च्या सदस्यांसाठी निवडणूक झाली. सरपंचांपैकी 11 वर ठाकरे सेनेने दावा केला आहे तर 10 वर बाळासाहेबांच्या शिवसेनेने वर्चस्व सांगितले आहे. भाजपने 4 ग्रामपंचायती जिंकतानाच तब्बल 58 सदस्य निवडून आणल्याचे स्पष्ट केले. 6 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या.
संगमेश्वर तालुक्यातही ठाकरे सेनेने सर्वाधिक ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखले. याठिकाणी राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे. तर शिंदे गटाने संगमेश्वरात 2 ग्रामपंचायती घेत खाते खोलले. लांजा व राजापूरमध्ये आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाचे वर्चस्व राखण्यात यश मिळवले. राजापूरमध्ये ठाकरे गटाचे 17, भाजप 3, बाळासाहेबांची शिवसेना 2, चार गावपॅनल, एक राष्ट्रवादी तर एका ग्रामपंचायतीवर मनसेने दावा केला आहे. लांजामध्ये निवडणुक झालेल्या 19 पैकी 13 वर ठाकरे सेना, भाजप 2 तर गावविकास पॅनलने 4 ठिकाणी वर्चस्व मिळवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button