महाराष्ट्र मराठी पत्रकार संघातर्फे राजेंद्रप्रसाद मसुरकर यांना गौरविणार, पत्रकार दिनी राज्यपालांच्या हस्ते होणार सन्मान
रत्नागिरी/- महाराष्ट्र मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त सन्मान करण्यासाठी रत्नागिरी येथील ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकारिता विषयाचे अध्यापक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांची निवड करण्यात आली आहे. ६ जानेवारी रोजी येणाऱ्या पत्रकार दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात येईल.
महाराष्ट्र मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना गौरविण्यात येते. या वर्षी महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील मराठी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकारांचा मुंबईत राजभवनमध्ये सायंकाळी ४ वाजता आयोजित केलेल्या सोहळ्यात सन्मान करण्यात येईल. करोनामुळे निधन पावलेल्या पत्रकारांच्या मुलांना याच समारंभात संघातर्फे शिष्यवृत्त्या प्रदान करण्यात येतील. संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष किरण जोशी यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
राजेंद्रप्रसाद मसुरकर गेली तीस वर्षाहून अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध दैनिके आणि साप्ताहिकांमध्ये संपादकीय जबाबदारी सांभाळण्याबरोबरच त्यांनी रत्नागिरीचे गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि रत्नभूमी पत्रकारिता वर्ग याकरिता पत्रकारिता विषयाचे दीर्घकाळ अध्यापन केले आहे. मोटरवाहनाची मराठीतून माहिती देणारे ‘मोटार जगत’ हे पहिले मासिक त्यांनी १९९७च्या दिवाळीत सुरू केले. रत्नागिरीचे सुपुत्र चरित्रकार धनंजय कीर यांचे चरित्रही श्री. मसुरकर यांनी लिहिले आहे.
www.konkantoday.com