
मारुतीची टॉप सेलिंग कारच निघाली खराब! कंपनीने ३९ हजारांहून अधिक गाड्या तात्काळ परत मागवल्या,
भारतातील सर्वात मोठी वाहननिर्माता म्हणून ओळखली जाणारी मारुती सुझुकी नेहमीच विश्वासार्हता, कमी देखभाल खर्च आणि उत्तम मायलेजसाठी चर्चेत असते, त्यामुळे मारुतीच्या कोणत्याही कारमध्ये लहानसा दोष सापडला तरी बाजारात खळबळ उडणे स्वाभाविक आहे. यावेळीही तसंच काहीसं घडलं आहे. वाहन क्षेत्रात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कंपनीच्या एका लोकप्रिय एसयूव्हीमध्ये धोकादायक तांत्रिक बिघाड आढळल्याची माहिती समोर आल्यानंतर ग्राहकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.
गेल्या काही महिन्यांत या मॉडेलची जोरदार विक्री झाली होती. अनेकांनी ही कार दिवाळी, लग्नसराई आणि विशेष प्रसंगी घेऊन घरात आणली. पण, आता या मॉडेलबाबत आलेल्या नव्या अपडेटने अनेकांची झोप उडवली आहे. कंपनीने स्वतः पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात रीकॉल जाहीर केला आहे, ज्यामुळे प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे.
नेमका काय बिघाड? कुठे आढळली समस्या?
मारुतीने दिलेल्या माहितीनुसार, या एसयूव्हीच्या काही वाहनांमध्ये इंधनाची पातळी दर्शवणाऱ्या मीटरमध्ये गंभीर चुका दिसू लागल्या होत्या. काही वाहनांमध्ये इंधन टाकीतील पातळी वेगळी असताना, स्पीडोमीटरवरील गेज पूर्णपणे वेगळाच आकडा दाखवत होता. अशा परिस्थितीत चालक अचानक रस्त्यात अडकू शकतो, ज्यामुळे अपघाताची शक्यता वाढते.
त्यामुळे मारुतीने तात्काळ कारवाई करत या बिघाडाचे मूळ कारण स्पीडोमीटर असेंब्लीतील तांत्रिक दोष असल्याचे जाहीर केले आहे. कंपनी या दुरुस्तीची जबाबदारी पूर्णपणे स्वीकारत असून, ग्राहकांकडून कोणतेही शुल्क न आकारता हा भाग बदलून देणार आहे.
कोणकोणत्या वाहनांचा या रीकॉलमध्ये समावेश?
हा बिघाड ९ डिसेंबर २०२४ ते २९ एप्रिल २०२५ दरम्यान बनवण्यात आलेल्या वाहनांमध्ये आढळला असून, कंपनीने थेट एकूण ३९ हजार ५०६ वाहनांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरकडून या वाहनांच्या मालकांना थेट संपर्क करून तपासणीची वेळ देण्यात येणार आहे.
मारुती सुझुकीची दमदार विक्री, तरीही रीकॉलचा धक्का
आश्चर्य म्हणजे, नुकत्याच संपलेल्या ऑक्टोबर महिन्यात मारुतीने विक्रीत अप्रतिम वाढ नोंदवली आहे. कंपनीची एकूण विक्री २ लाख २० हजार ८९४ इतकी झाली. देशांतर्गत विक्री वाणिज्यिक वाहनांसह १ लाख ८० हजार ६७५ वर पोहोचली, जी कंपनीसाठी आतापर्यंतची सर्वोच्च नोंद आहे.
इतकंच नव्हे तर या महिन्याच्या सुरुवातीलाच मारुतीने ३ कोटी कार विक्रीचा ऐतिहासिक टप्पाही पार केला आहे. यात अल्टोने सुमारे ४७ लाख, वॅगन आरने ३४ लाख आणि स्विफ्टने ३२ लाख विक्री गाठली आहे.
कोणत्या कारमध्ये बिघाड होता?
सर्वात मोठा प्रश्न, या बिघाडाचा फटका नेमका कोणत्या लोकप्रिय मॉडेलला बसला? मारुतीने रीकॉल केलेली कार म्हणजे कंपनीची प्रचंड लोकप्रिय आणि चर्चेत असलेली हायब्रिड SUV… मारुती सुझुकी ग्रँड व्हिटारा!
ही कार अत्यंत लोकप्रिय हायब्रिड SUV असून तिची किंमत १० लाख ७७ हजार ते १९ लाख ७२ हजार (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.




