विखुरलेला विरोधी पक्ष एका झेंडय़ाखाली एकत्र यावा, अशी अपेक्षा ठेवली तर काँग्रेसमधील मित्रांना ठसका का लागावा? -शिवसेनेचा सवाल
पुरोगामी लोकशाही आघाडी अर्थात युपीएच्या अध्यक्षपदावरून राज्यात शिवसेना-काँग्रेसमध्ये जुंपल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युपीए अध्यक्षपदाची सुत्रं द्यावी, असं शिवसेनेनं म्हटलं होतं. शिवसेनेच्या या विधानावर काँग्रेसकडूनही उत्तर देण्यात आलं. काँग्रेसनं दिलेल्या उत्तरावरून आता शिवसेनेनं काँग्रेस नेत्यांनाच सवाल केला आहे.
काँग्रेसकडून देण्यात आलेल्या उत्तरानंतर शिवसेनेनं काँग्रेसला सल्ला देत टोलाही लगावला आहे. सामना अग्रलेखातून शिवसेनेनं काँग्रेस व काँग्रेस नेतृत्वाविषयी भाष्य केलं आहे. “पुरोगामी लोकशाही आघाडी म्हणजे यूपीए अधिक मजबूत होणे ही काळाची गरज आहे, पण ते व्हायचे कसे?काँग्रेस आजमितीस नक्कीच मोठा पक्ष आहे. पण मोठा म्हणजे नक्की काय आकारमानाचा? काँग्रेसच्या खालोखाल तृणमूल, अण्णा द्रमुक असे पक्ष संसदेत आहेत व हे सर्व भाजप विरोधक आहेत. देशातील विरोधी पक्षात पोकळी निर्माण झाली आहे व विखुरलेला विरोधी पक्ष एका झेंडय़ाखाली एकत्र यावा, अशी अपेक्षा ठेवली तर काँग्रेसमधील मित्रांना ठसका का लागावा? देशात भाजपाविरोधात असंतोषाच्या ठिणग्या उडत आहेत. लोकांना बदल हवाच आहे. त्याप्रमाणे पर्यायी नेतृत्वाची गरज आहे. ते कोण देऊ शकेल हा प्रश्न आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
www.konkantoday.com