
थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग चॅलेंज स्पर्धेत रोटरी स्कूल खेडच्या आध्या निकमला रौप्य व कांस्यपदक
खेड : शनिवार दिनांक २० ऑगस्ट व रविवार दिनांक २१ ऑगस्ट २०२२ रोजी थायलंड पटाया येथे झालेल्या आशिया स्पीड स्केटिंग चॅलेंज आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रोटरी स्कूलची कु. आध्या धनंजय निकम हिने रौप्य व कांस्यपदक पटकावून आंतरराष्ट्रीय स्तरावर रोटरी स्कूलचे नाव उज्वल केले आहे. आध्या हिचे प्रशालेत आगमन होताच भव्य लेझीम पथक व विद्यार्थ्यांच्या कवायत संचलनाने तसेच ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढून तिचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या हस्ते आध्या निकम हिचा भव्य सत्कार करण्यात आला. या कौतुक सोहळ्याप्रसंगी समन्वयक राहुल गाडबैल, प्राथमिक विभागप्रमुख श्री. शैलेश देवळेकर, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे तसेच कु. आध्या हिचे पालक सौ. दिप्ती निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
सदरच्या कौतुक सोहळ्याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या यशामुळे सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.