महामार्ग चौपदरीकरणाचे ठेकदार कंपनीच्या मनमानी कारभारामुळे महामार्गावरील अपघातांचा धोका वाढला

खेड : मुंबई गोवा महामार्गावर दर दोन दिवसाआड होणाऱ्या जीवघेण्या अपघातांना आळा घालण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून महामार्ग चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र चौपदरीकरण करताना तयार केले जाणारे दगड- मातीचे पर्यायी रस्ते, तसेच मुळ रस्त्यावर पावसात पडलेले खड्डे बुजवण्यात ठेकेदार कंपनी दिरंगाई करत असल्याने जीवघेणे अपघातांना आळा बसण्याऐवजी अपघातांचा धोका वाढला आहे.
रायगड जिल्ह्यातील पनवेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप या दरम्यानचा मुंबई गोवा हा अवघड वळणे आणि घाटांचा महामार्ग. या मार्गावर दर दोन दिवसाआड होणाऱ्या अपघातामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेकजण कायमचे जायबंदी झाले आहेत. महामार्गावरील या जीवघेण्या अपघातांना आळा घालण्यासाठी या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र गेली अनेक वर्षे चौपदरीकरणाचे काम रखडले असल्याने महामार्गावरून प्रवास करणे आता पहिल्यापेक्षा जोखमीचे झाले आहे.
महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेळेत व्हावे या साठी शासनाने कामाचा ठेका एकाच कंपनीला न देता तालुकावार विभागून दिला आहे. ज्या ठेकेदार कंपनीला हा ठेका मिळाला आहे. त्या ठेकेदार कंपनीने महामार्ग चौपदरीकरणाचे काम पुर्ण होईपर्यत नव्या आणि मुळ रस्त्याची देखभाल करायची आहे. शिवाय महामार्गाचे काम करताना तयार करावे लागणारे पर्यायी मार्ग हे खडी आणि डांबराचे करायचे आहेत. पर्यायी मार्गावर कोणत्याही वाहनाचा अपघात होवू नये हा त्या मागचा उद्देश आहे. मात्र चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्या पावसात मुळ रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यास टाळाटाळ करत आहेतच परंतू पर्यायी रस्ते तयार करताना तेही डांबराचे न बनवता दगड मातीचे बनवून वाहन चालक आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत.
खेड तालुका हद्दीत सुरु असलेल्या मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचे सुपरव्हिजन करणारे महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता बांगर यांच्याशी याबाबत चर्चा केली असता ” महामार्गाचे काम पुर्ण होईपर्यंत मुळ रस्त्याची देखभाल तसेच पर्यायी मार्गाचे डांबरीकरण हे संबधित ठेकेदार कंपनीने करायचे आहे’ असे सांगितले त्यावर त्यांना खेड तालुक्याच्या हद्दीत जी कंपनी काम करते आहे ती कंपनी ” पावसात रस्त्यावर पडलेले खड्डेही भरत नाही आणि पर्यायी मार्गही दगडमातीचे
बनवून चालक आणि प्रवाशी यांच्या जीवाशी खेळत आहे’ असे सांगितले असता ” असं आहे का? मग आम्ही एजन्सीला तसं पत्र देवून खड्डे भरायला सांगतो’ असे ठोकळेबाज उत्तर दिले. बांगर यांनी दिलेल्या या उत्तरामुळे ठेकेदार कंपनी आणि अधिकारी यांच्यामध्ये काही तरी साटंलोटं असाव अशी शंका यायला वाव आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम घेतलेल्या ठेकेदार कंपन्यांनी अशाच प्रकारे मनमानी करून चालक आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ करण्याचा आपला प्रयत्न सुरु ठेवला तर महामार्गावरील अपघात कमी होण्याऐवजी अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता अधिक आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button