
एसटी डेपोमध्ये बससाठी आलेल्या टँकरमधून तब्बल ६१ लिटर डिझेल गायब
एसटी डेपोमध्ये बससाठी आलेल्या टँकरमधून तब्बल ६१ लिटर डिझेल गायब झाले होते मंडणगड एसटी डेपोत झालेल्या या डिझेल चोरी प्रकरणी टँकर चालक आणि क्लिनरला पोलिसांनी रंगेहात पकडले.
पोलिसांच्या माहितीनुसार, टँकर चालक मोहन शामराव देवकत (४०, डोंगरगाव, जि. सोलापूर) आणि क्लिनर शाहू भीमराव सूर्यवंशी (२७, मिरज, जि. सांगली) यांनी चोरीसाठी चतुराईने टँकरमध्ये गुप्त कप्पा तयार केला होता. टँकरच्या झाकणाजवळ अतिरिक्त वॉल लावून मुख्य टाकीतील डिझेल या गुप्त कप्प्यात वळवले जात होते.डेपो अधिकाऱ्यांनी संशय आल्याने तपास सुरू केला आणि चोरीचा संपूर्ण डाव उघडकीस आला. डेपो अधिकारी मदनीपाशा बहाउद्दीन जुनेदी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी ६१ लिटर डिझेल (किंमत ₹५,४२५) जप्त करून दोघांनाही ताब्यात घेतले आहे




