
आगामी काळात सिंधुदुर्ग सह सहा ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षक कुठून आणणार
राज्याचे आर्थिक बजेट घोषित करण्यात आले. पाच ते सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची घोषणा राज्य शासनाने केली. मात्र या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिकवणाऱ्या वैद्यकीय शिक्षकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापकांची पदे कायम स्वरूपात भरण्यात येत नाही. ही भरती प्रक्रियाच खोळंबल्यामुळे राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत सुमारे १२०० वैद्यकीय शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
राज्यात वैद्यकीय शिक्षकांची सुमारे ३ हजार ११४ मंजूर पदे आहेत. यांपैकी १ हजार २००४ पदे रिक्त आहेत. सुमारे ४० टक्के रिक्त पदे असूनही ती भरण्यासाठी शासन ठोस भूमिका घेत नाही.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रिक्त असलेली पदे भरण्यात येत नाही. तर पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी आणि सहायक प्राध्यापकांना मागील पंधरा वर्षांपासून कायमस्वरूपी पदोन्नती दिली नाही. यामुळे वैद्यकीय शिक्षकांच्या रिक्त जागा तशाच राहातात. आगामी काळात सिंधुदुर्ग, धाराशीव, नाशिक, रायगड, सातारा, अमरावती आणि परभणी येथे उभारण्यात येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कुठून वैद्यकीय शिक्षक आणणार हाच खरा प्रश्न आहे.
www.konkantoday.com