दक्षिण रत्नागिरीतील चार तालुक्यातील १७५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा भाजपचा निर्धार
रत्नागिरी- दक्षिण रत्नागिरीतील चार तालुक्यातील १७५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकात स्वबळावर लढण्याचा निर्धार भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला. भाजपच्या संपर्क कार्यालयात तालुकाध्यक्ष, सरचिटणीस, तालुका प्रभारी आणि प्रमुख पदाधिकार्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
या वेळी ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा प्रत्येक तालुकाध्यक्षाने घेतला. भाजपच्या माध्यमातून 1068 उमेदवार विविध प्रभागातून निवडणूक लढवतील, अशी तयारी केली आहे. प्रमुख पदाधिकारी, तालुकाध्यक्ष हे निवडणूक प्रचारासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संपर्क दौरे करत आहेत. त्यांच्या संपर्कानुसार भाजपला विजयासाठी यशदायी वातावरण असल्याचा अनुभव येत आहे.
अॅड. पटवर्धन म्हणाले, भाजपचे कार्यकर्ते एकसंधपणे निवडणूक लढवतील व चांगले यश प्राप्त होईल. सद्यस्थितीत शेतकर्यांचे प्रश्न, बेरोजगारी व औद्योगिक विकास याबाबत सत्ताधार्यांची भूमिका या मुद्द्यावर भर देण्याचे ठरले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राबवलेल्या अंत्योदय योजना मतदारांपर्यंत पोहोचवत गावचा विकास हा मुद्दा अग्रेसर ठेवत भाजप या निवडणुकीला सामोरा जाईल.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण, माजी आमदार नीलेश राणे, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह अन्य नेते ग्रामपंचायत प्रचारात सहभागी होतील. भाजपचे सर्व कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचून मतदानाचा कौल भाजपच्याच बाजूने प्राप्त करून घेण्यात यश मिळवू, असा विश्वास अॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.
या बैठकीला शैलेंद्र दळवी, सचिन वहाळकर, राजेश सावंत, विजय सालीम, अभिजित गुरव, मुन्ना चवंडे, मुन्ना खामकर, प्रमोद अधटराव यांच्या अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com