
सावंतवाडी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब आक्रमक, सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या विरुद्ध पोलिसात तक्रार
निवडणूक निकालानंतर सोशल मीडियावर एका व्यक्तीकडून ‘निवडणूकीत पैसे घेऊन मॅनेज झाल्याची ‘ आक्षेपार्ह कमेंट केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब चांगल्याच आक्रमक झाल्या असून त्यांनी संबंधिताविरोधात सावंतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.तसेच या प्रकरणी महिला आयोगाचेही त्यांनी लक्ष वेधलं असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली असल्याची माहिती त्यांनी दिली.याबाबत सौ. अर्चना घारे म्हणाल्या, अनंत मांजरेकर नामक व्यक्तीने ‘पाच करोड मिळाले खूप झाले ‘ अशी बदनामीकारक कमेंट केली. निवडणूक काळात ‘मॅनेज होऊन उभ्या राहील्या ‘ अशा अफवा उठवल्या गेल्या होत्या.
आज अशा कमेंट येऊ लागल्याने संतापलेल्या घारे यांनी पोलिसांसह महिला आयोगाच लक्ष वेधलं. तसेच संबंधितांवर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.राजकारणात प्रामाणिकपणे येणाऱ्या व काम करणाऱ्या महिलांवर अशा कमेंट होत असतील तर ते खपवून घेणार नाही. माझ्यासह कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम करत स्वाभिमान जपला. त्यामुळे विनाकारण खोटे आरोप कोणीही करू नये. पैसे घेतले असे आरोप करण्याऱ्यांनी हिंमत असेल तर समोर यावं व पुरावा द्यावा, असे आव्हान देखील त्यांनी दिले. तसेच चुकीचं बोलणाऱ्यांवर कारवाई होणार, चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला.