
जुनी झालेली रेशन कार्ड बदलून देण्याची भाजपा युवा मोर्चाची मागणी
राजापूर : तालुक्यातील सर्व शिधा पत्रिका धारकांना देण्यात आलेल्या शिधापत्रिका या जीर्ण झाल्या असून आता सर्व ग्राहकांना नव्याने शिधापत्रिका द्याव्यात, अशी मागणी राजापूर तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे एक निवेदन मंगळवारी राजापूर तहसीलदारांना देण्यात आले. निवासी नायब तहसीलदार दीपाली पंडित यांना हे निवेदन देण्यात आले. राजापूर तालुक्यातील रास्त धान्य घेणार्या ग्राहकांना सन 2012 मध्ये नवीन शिधापत्रिका देण्यात आलेल्या होत्या. त्याचा कालावधी संपला असून आता दहा वर्षानंतरही ग्राहकांना नवीन शिधापत्रिका देण्यात आलेल्या नाहीत. सध्याच्या शिधापत्रिका या जीर्ण झाल्या आहेत. त्यामध्ये रास्त धान्य दुकानदारांकडून जे दरमहा धान्याची विक्री लिहिली जाते, त्यात सन 2018 पासून वाढीव स्लिप जोडून धान्याचे प्रमाणे लिहिले जात आहे. यापूर्वीच नवीन शिधापत्रिका मिळणे आवश्यक होते. नवीन शिधापत्रिका द्याव्यात, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे दीपक बेंद्रे, संतोष धुरत, राजेश गावकर, अरविंद लांजेकर, भूषण सावंत, सर्वेश पाटील, अजित ढवळे, संदेश आंबेरकर, अक्षय खोडे, प्रशांत मोडकर आदी उपस्थित होते.