रत्नागिरीच्या विठुरायाची नगरप्रदक्षिणा….. अर्थात वैकुंठ चतुर्दशी सोहळा!

रत्नागिरी शहरात आणि आसपासच्या पंचक्रोशीत राहणाऱ्या बहुतांश नागरिकांना कार्तिकी एकादशी ची जत्रा माहिती नाही असं नाही. रत्नागिरीच्या बाजारपेठेतील विठ्ठल मंदिरात आषाढी आणि कार्तिकी एकादशीला दर्शनासाठी हजारो भाविक येतात. त्यातही कार्तिकी एकादशीची यात्रा ही वेगळी पर्वणी असते. मंदिरात जाऊन विठ्ठल रखुमाईचं दर्शन घ्यायचं आणि मंदिरापासून राम नाक्यापर्यंत भरलेल्या जत्रेमध्ये फिरायचं हा दरवर्षीचा ठरलेला कार्यक्रम असतो. रात्री बारा वाजता श्री विठ्ठलाचा रथ आणि पालखी मंदिरा बाहेर येते आणि विठ्ठलाची नगरभेट सुरू होते. अर्थात ह्या फेरीमध्ये मंदिराच्या लगतचा भाग येतो आणि आणि त्याच रस्त्यावरील भाविकांना श्री विठ्ठलाचे दर्शन होते. पण रत्नागिरी म्हणजे मंदिराच्या लगतचा भाग नक्कीच नव्हे, ही जाणीव तत्कालीन कार्यकर्त्या भक्त मंडळींना होती. या रत्नागिरी शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात वसलेल्या सामान्यातील सामान्य विठ्ठल भक्तांना देवदर्शनाचं पुण्य कसे लागेल याचा विचार त्यावेळी कार्यरत भाविकांनी केला होता. त्यामुळेच कार्तिकी एकादशी नंतर येणाऱ्या वैकुंठ चतुर्दशी च्या दिवशी श्री विठ्ठलाची पालखीतून नगर प्रदक्षिणा करण्याची पद्धत सुरू झाली असावी असं वाटतं. ह्या नगरप्रदक्षिणे मागचा विचार त्याकाळी किती पुढारलेला होता किंवा दैवताच्या व्यक्तिमत्त्वाला कसा साजेसा होता हे नगरप्रदक्षिणा केल्यावरच कळतं. श्री विठ्ठल हे सर्वसामान्य समाजाचं दैवत! ह्या दैवताकडे ना कसलं सोवळं-ओवळ ना कसला जातिभेदाचा विचार! सर्व भक्तांची ही विठू माऊली आपल्या भक्तांबरोबर वारीमध्ये सहभागी असते असा विश्वास प्रत्येक विठ्ठल भक्ताच्या मनात असतो. त्यामुळे अशी ही विठू माऊली आपल्या सर्वांच्या घरावरून, वाडीतून जावी आणि देवळात येऊन दर्शन घेऊ न शकलेल्या भक्तांना विनासायास दर्शन घेता यावे अशी या नगरप्रदक्षिणे मागची संकल्पना असणार. अर्थात भक्तांना विठुरायाला भेटण्याची जितकी इच्छा असते तितकीच ह्या लेकुरवाळ्या विठुरायाला देखील भक्तमंडळींच्या भेटीची आस असते. त्यामुळे कार्तिकी एकादशीच्या रथात असलेला विठुराया पेक्षा वैकुंठ चतुर्दशीला नगर प्रदक्षिणेसाठी पालखीत बसलेला विठ्ठल जास्त खुश असेल असं वाटत राहतं.

नगरप्रदक्षिणा म्हणजे नगराच्या वेशीवरून मारलेली फेरी असा याचा सरळ अर्थ घेता येईल. जशी आपण देवळामध्ये देवाच्या गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतो अगदी तसंच नगरात राहणाऱ्या सर्व भक्तांभोवती देवानं मारलेली प्रदक्षिणा म्हणजे नगर प्रदक्षिणा असाही याचा अर्थ घेता येईल. वर्षभर आपण ज्या देवाच्या समोर जाऊन आपली गाऱ्हाणी मांडतो तोच देव आपल्या रोजच्या जायच्या यायच्या रस्त्यावरून आपल्याला भेटायला येतो, आपली विचारपूस करायला येतो ही भावनाच किती सुखद आहे, हे नगरप्रदक्षिणा करत असताना जाणवतं राहतं.

ही नगर प्रदक्षिणा नक्की असते तरी कशी?

वैकुंठ चतुर्दशी च्या दिवशी दुपारी श्री विठ्ठलाला पालखीत घेऊन भक्तमंडळी मंदिराबाहेर पडतात. गोखले नाका, राधाकृष्ण नाका मार्गे धनजी नाक्यामध्ये पहिली आरती होते. नंतर गवळी वाड्याच्या घाटी ने विठुराया जेल रस्त्यावरती येतो आणि जेलनाका मार्गे कॉलेज समोरून विश्वेश्वर घाटी उतरून विश्वेश्वराच्या देवळात विसावतो. विश्वेश्वराची भेट झाल्यावर राजिवडा मार्गे गोडीबाव येथे येऊन चवडे वठार, खडपे वठार मार्गे मांडवी नाका मार्गे फिशरिज फॅक्टरीपर्यंत येऊन तिथून समुद्राकडे प्रस्थान होते. पुळणीतून चालत मंडळी पेठ किल्ल्यात येतात आणि सांब मंदिरात विसावतात. नंतर खालच्या राममंदिराजवळ येऊन तिथून मुरुगवाडा मार्गे मिऱ्याकडे जातात. पांढऱ्या समुद्राला लागून असलेल्या रस्त्याने भोळेवाडीपर्यंत जाऊन तिथल्या सहाणेवर पालखी विसावते. नंतर मिऱ्या रस्त्याने बाहेर पडून पुन्हा शहराकडे येताना रेमंड गेस्ट हाउस जवळून खाजणातून सध्याच्या हायवेला येतात आणि परटवणे नाक्यात येऊन खेडेकर वाडी समोरून खंडकर यांच्या भार्गवराम मंदिरात विसावतात. दुपारी सुरू झालेली नगरभेट भार्गवराम मंदिरात येते तेव्हा संध्याकाळ झालेली असते. तिथून पुढचा प्रवास हा नर्मदा हायवेच्या पायथ्याने सावंत नगर मार्गे फणशीकडे होतो. एक सरळसोट चढ काढून विठूमाऊली वरच्या फगर वठारात येते. हा सगळा प्रवास अत्यंत वेगळा असून अनुभवण्यासारखा आहे. काळोखातून, दगडधोंड्यातून बॅटरीच्या प्रकाशात ह्या सगळ्या भागातून फिरण्याची मजाच वेगळी! नंतर डीएसपी बंगला जवळच्या उताराने पोलीस स्टेशन समोरून पालखी धनजी नाक्यात उतरते. इथे पुन्हा आरती होते. म्हणजे धनजी नाका ते धनजी नाका अशी ही फेरी! इथे जुन्या रत्नागिरीच्या वेशीची नगरप्रदक्षिणा पार पडते. विठुरायाचा परतीचा प्रवास धनजीजी नाका, राधाकृष्ण नाका, गोखले नाका मार्गे पुन्हा देवळात येतो आणि आणि या या आगळ्यावेगळ्या सोहळ्याची सांगता होते. जवळपास नऊ ते दहा तासाची चाल चालून विठुराया आपल्या भक्त मंडळींसह नगरभेट पूर्ण करतो. ही एका अर्थाने वारीच नाही का? ज्या पूर्वजांनी हा नगर प्रदक्षिणेचा मार्ग आखला असेल त्यांच्या सामाजिक जाणिवांबद्दल कृतज्ञ रहावसं वाटतं.

यावर्षी शनिवारी २८ तारखेला नगरप्रदक्षिणा होणार आहे.पण covid-19 च्या नियमांमुळे नगरभेटीवर अनेक बंधन आहेत. त्यामुळे सर्वांना सामील होणं शक्य नाहीये. मात्र २०२१ च्या नगरप्रदक्षिणेचा लाभ सर्वच विठ्ठल भक्तांनी जरूर घ्यावा आणि ज्यांना जुन्या रत्नागिरीच्या वेशी विषयी कुतूहल आहे अशा सर्वांनी देखील यामध्ये सहभागी व्हावं. एक नगरप्रदक्षिणा केली तर आषाढी वारीच्या एक दिवसाची चाल चालल्याचं समाधान मिळेल हे नक्की!
सध्या मात्र २०२१ च्या वैकुंठ चतुर्दशी ची वाट बघणं इतकच आपल्या हातात आहे. तोपर्यंत……

पंढरीनाथ महाराज की जय!

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button