
मुंबई वगळता महाराष्ट्रभरात आता एकच बांधकाम विकास नियमावली लागू
गेली तीन वर्षे रखडलेल्या एकात्मिक बांधकाम विकास नियमावलीस (युनिफाईड डेव्हलपमेंट रूल्स-यूडीआर) महाराष्ट्र सरकारने अखेर मान्यता दिली असून मुंबई वगळता महाराष्ट्रभरात आता एकच नियमावली लागू झाली आहे. या एकात्मिक नियमावलीमुळे चटईक्षेत्र निर्देशांकाच्या (एफएसआय) गैरवापराला चाप बसेल, नियमांना बगल देऊन, पळवाटा शोधून एफएसआयचा गैरवापर होण्याचे प्रकार बंद होतील आणि राज्य सरकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची उत्पन्नवाढ होण्याबरोबरच पारदर्शकतेला चालना मिळून ग्राहकांची होणारी फसवणूक थांबू शकेल. वाढीव प्रमाणात घरे उपलब्ध होऊन घरांच्या किमतीदेखील आटोक्यात राहतीलयुनिफाइड डीसीआरमुळे एफएसआयविषयक नियमांचे सुसूत्रीकरण होऊन मूळ एफएसआय, टीडीआर, मार्जिनल एफएसआय, इन्सेंटिव एफएसआय आदी सर्व बाबींची गणितीय सूत्रे सुस्पष्टरित्या नमूद केल्यामुळे स्थानिक पातळीवर नियमांचे मनमानी पद्धतीने अर्थ लावण्याच्या प्रकारांना चाप बसणार आहे.
१५०चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडधारकांना स्ववापराच्या घराच्या बांधकामासाठी स्वतंत्र परवानगीची आवश्यकता रद्द करण्यात आल्यामुळे स्वतःचे घर बांधणार्यांना मोठाच दिलासा मिळेल. अशा बांधकामासाठी आवश्यक ते विकासशुल्क आदींचा भरणा विहित नमुन्यात लाइन आराखड्यासह नकाशा स्थानिक प्राधिकरणाकडे सादर केल्याची पावती हाच बांधकाम परवाना समजण्यात येणार असून ३०० चौमीपर्यंतच्या भूखंडधारकांना १० दिवसांत परवानगी देण्याची तरतूदही युडीआरमध्ये करण्यात आली आहे.
www.konkantoday.com