
भाजपतर्फे रत्नागिरीत महावितरणविरोधात आंदोलन,महाविकास आघाडीचा धिक्कार
रत्नागिरी
ठाकरे सरकारचा धिक्कार असो, वीज बिले माफ करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, भारत माता की जय, वंदे मातरम, भाजपचा विजय असो अशा घोषणा देत आज नाचणे रोड येथील महावितरण कार्यालय परिसर दणाणून गेला.
महाविकास आघाडी शासनाचा धिक्कार करत आणि रद्द करा, रद्द करा वाढीव वीजबिले रद्द करा, अशी मागणी करत आज भाजपच्या वतीने महावितरण कार्यालयाबाहेर वाढीव वीज बिले फाडून अनोखे आंदोलन करण्यात आले.
शासन वीजमाफी करत नाही तोपर्यंत बिलांसाठी कर्मचारी पाठवू नका, अशी तंबी भाजप नेत्यांनी महावितरणच्या अधिकार्यांना दिली. आपल्या भावना शासनाकडे पोहोचवतो, अशी ग्वाही महावितरणचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी भाजप शिष्टमंडळाला दिली.
महावितरणच्या नाचणे येथील कार्यालयाबाहेर सकाळी साडेअकरा वाजता भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तसेच या वेळी भाजपने महावितरणची बिले कार्यालयाबाहेर फाडून टाकली. महाविकास आघाडी सरकार व महावितरणचा निषेध करत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष सचिन करमरकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, राजेश सावंत, राजू भाटलेकर, सचिन वहाळकर, भैय्या मलुष्टे, उमेश कुळकर्णी, अनिकेत पटवर्धन, संदीप शिंदे, राजन फाळके, ऐश्वर्या जठार, दामोदर लोकरे, राजीव कीर, बिपीन शिवलकर, राजश्री शिवलकर, प्राजक्ता रुमडे, राजेंद्र पटवर्धन व सुमारे १००हून अधिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनात भाग घेतला.
या वेळी श्री. सायनेकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महावितरणे वाढीव बिले माफ करावी. बिल आकारणीसाठी कर्मचारी पाठवू नका, अशी मागणी या वेळी त्यांच्याकडे करण्यात आली. आम्ही कोणाचीही वीज तोडलेली नाही, असे सायनेकर यांनी स्पष्ट केले. लोकांनी भरलेल्या बिलामध्ये शासनाच्या आदेशानुसार सवलत मिळू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com