मुंबई गोवा महामार्गाच्या खड्डे भरण्याचे कामात घोळ ,महामार्गाची दुरूस्ती न झाल्यास कार्यालयात साप सोडण्याचा संदीप सावंत यांचा इशारा
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण-परशुराम ते आरवली या रस्त्यावरील खड्डे भरणे ही चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या कंपनीचीच जबाबदारी आहे. पण त्यासाठी नवीन ठेकेदार नियुक्त करण्यात आला आहे. त्याची मुदतही संपली. तरी देखील अधिकारी दिशाभूल करत आहेत. सुमारे ४ कोटी ८९ लाखाचे हे काम झालेच नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराचा ठेका तात्काळ रद्द करून चेतक आणि ईगल या मुख्य ठेकेदार कंपनीकडून खड्डे भरून घ्यावेत, अन्यथा कार्यालयात साप आणून सोडेन, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी घेतली आहे.
यावेळी त्यांनी महामार्ग खड्डे भरण्याच्या कामाचा जणू पर्दाफाशच केला. ते पुढे म्हणाले, रस्त्याची दुरूस्ती डागडुजी ही जबाबदारी चौपदरीकरण करणार्या मूळ ठेकेदार कंपनीची आहे. त्यांनी त्यासाठी प्रथम परशुराम आरवली हायवेज आणि ब्ल्यूम कं. प्रा. लिमिटेड यांना खड्डे भरण्याचे काम दिल्याचे सांगितले. त्यांनी काम केले नाही म्हणून कोणतीही कारवाई न करता काळ्या यादीत न टाकता थेट ओम मनिषा कन्स्ट्रक्शन यांना काम देण्यात आले. ४ कोटी ८९ लाख या कामासाठी मंजूर करण्यात आले. ८ मे रोजी कामाचे आदेश देण्यात आले आणि ४ नोव्हेंबर २०२० ला काम पूर्ण करायचे होते, अशी माहिती संदीप सावंत यांनी देवून नवा घोळ समोर आणला आहे.
दिलेल्या मुदतीत मनीषा कन्स्ट्रक्शनने काम केलेच नाही आणि आता प्रशासन अधिकारी सांगताहेत हे काम मनीषा कन्स्ट्रक्शनला दिलेले आहे. काम तर झालेच नाही, मुदत ही संपली. मग ते ४ कोटी ८९ लाख गेले कुठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अधिकारी फक्त दिशाभूल करीत आहेत. मोठा घोळ या कामात झाला आहे.
www.konkantoday.com