पद्मश्री मारुती चितमपल्ली यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली निसर्गाशी संवाद साधण्याची नवी दृष्टी देणारा तपस्वी अरण्यऋषी हरपला- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 18 :- ज्येष्ठ साहित्यिक, पक्षीशास्त्रज्ञ, वन्यजीव अभ्यासक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने साहित्य, पर्यावरण, सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने निसर्गाशी संवाद साधण्याची नवी दृष्टी देणारा तपस्वी अरण्यऋषी हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, मारुती चितमपल्ली सरांनी आपले संपूर्ण आयुष्य वन, प्राणी, पक्षी आणि निसर्गाच्या गूढ अभ्यासासाठी समर्पित केले. वृक्ष, पाने, फुलं, पक्षी, प्राणी, डोंगर, अशा निसर्गातील अनेक गोष्टींची माहिती असलेला विश्वकोश ही त्यांची ओळख होती. त्यांच्या लेखनातून मराठी साहित्यात निसर्गाविषयी संवेदनशील जाण निर्माण झाली. त्यांच्या लेखणीतून मराठी शब्दसंपदेत अनेक नवे शब्द, संकल्पना आणि अनुभवांची भर पडली आहे.वनविभागात तीन दशकांहून अधिक सेवा बजावत असताना त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिलं. त्यांच्या प्रयत्नांतून ही अभयारण्ये जैवविविधतेच्या संवर्धनासाठी आदर्श ठरली.

पक्षीशास्त्र आणि वन्यजीव अभ्यासाच्या क्षेत्रात त्यांनी केवळ महाराष्ट्रापुरतेच नव्हे, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली वेगळी ओळख निर्माण केली. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी अत्यंत प्रभावी कार्य केले.30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. हा गौरव त्यांच्या संपूर्ण कार्याचा योग्य सन्मान होता. मात्र, त्यानंतर अल्पावधीतच त्यांचे निधन झाले, हे अधिकच वेदनादायी आहे. मारुती चितमपल्ली यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button