
राजापूर मतदार संघात महाविकास आघाडीतच स्पर्धा.
राजापूर विधानसभा विधानसभा मतदार संघात जागा वाटपाचा मुद्दा कळीचा झाला आहे. राजापुरात विद्यमान आमदार उद्धवसेनेचे असले तरी महाविकास आघाडीतील काँग्रेस या जागेसाठी अत्यंत आग्रही आहे.दुसऱ्या बाजूला शिंदेसेनेने मात्र एकच उमेदवार निश्चित करून जोरदार प्रचारही सुरू केला आहे.लोकसभा निवडणुकीत उद्धवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांना या मतदारसंघात आघाडी मिळाली होती. येथील विद्यमान आमदार राजन साळवी हे उद्धवसेनेचेच आहेत. मात्र, काँग्रेसचा विचार करता या मतदारसंघातच काँग्रेसची ताकद अधिक आहे. त्यामुळे काँग्रेसने सातत्याने या मतदारसंघाची मागणी केली आहे. अजूनही जागावाटप झाले नसल्याने येथे उद्धवसेना लढणार की काँग्रेस, हा प्रश्न बाकी आहे.आघाडीतील संभ्रम बाकी असतानाच शिंदेसेनेने गेल्या काही महिन्यांत उद्धवसेनेला मोठे खिंडार पाडले आहे. माजी तालुकाप्रमुखांसह अनेक जण शिंदेसेनेत गेले आहेत. त्यामुळे येथील रंगत वाढणार आहे.