रत्नागिरी जिल्हा मंडप लाईट साऊंड इव्हेंटंस आणि केटर्स असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
करोना महामारी मुळे बसलेल्या आर्थिक धक्कय़ातून सावरण्यासाठी शासनाने सहाय्य करावे, या मागणीसाठी रत्नागिरी जिल्हा मंडप लाईट साऊंड इव्हेंटंस आणि केटर्स असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले.
असोसिएशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करोनामुळे देशातील अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत.
त्यामुळे मोठय़ा आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. सामाजिक, वैवाहिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमही होत नसल्याने तंबू, मंडप, कॅटरिंग, मंगल कार्यालय, बॅक्वेट हॉल, ध्वनी-प्रकाश योजना, सजावट, कार्यक्रम व्यवस्थान आदी सेवा देणारे अडचणीत आले आहेत
त्यांना आर्थिक सहाय्य करण्यात यावे, सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये मंडप, लॉन, मंगल कार्यालय, सभागृहाच्या क्षमतेपेक्षा ५० लोकांच्या आसन क्षमेतेची परवानगी देण्यात यावी किंवा कमाल ५०० व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रमाची परवानगी देण्यात यावी, या व्यवसायाशी संबंधित जीएसटी १८ टक्कय़ांवरून ५ टक्के करावा, कर्जधारकाचे व्याज माफ करावे स्थिती सामान्य होईपर्यंत मासिक कर्जफेड चालू करू नये, तसेच या व्यवसायांना उद्य्ोगाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी आहे.ऑल इंडिया टेन्ट डिलर्स वेलफेअर ऑर्गनयझेशन या राष्ट्रीय संघटनेशी संलग्न ऑल महाराष्ट्र डिलर्स ऑर्गनायझेशन व संपूर्ण भारतातील शाखांची बैठक ऑगस्ट महिन्यात व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून घेण्यात आली. यामध्ये केंद्र सरकारच्या ‘राहत पॅकेज’ देण्याच्या विषयावर चर्चा झाली. या पॅकेजमध्ये आदरातिथ्य सेवा आणि करोनाने प्रभावित व्यवसायांना सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकार मदत करण्याच्या विचाराधीन आहे. या धर्तीवर महाराष्ट्रातील संबंधित व्यवसाय धारकांना मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे
या आंदोलनात असोसिएशनचे अध्यक्ष अमरेश सावंत, उपाध्यक्ष राजन कोकाटे, सचिव सुहास ठाकूरदेसाई, खजिनदार मिलींद गुरव यांसह अन्य पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले होते.
www.konkantoday.com