
गुहागर तालुका ओबीसी बांधव १५ सप्टेंबर रोजी गुहागर तहसील कार्यालयावर धडकणार
आबलोली (संदेश कदम) : मराठ्यांना ओबीसीतून सरसकट कुणबी मराठा म्हणून दाखले देण्याच्या शासन अध्यादेशाच्या निषेधार्थ गुहागर तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समिती हजारोंच्या संख्येने तहसीलदार कार्यालय गुहागर येथे धडक देणार आहेत.
मराठ्यांना ओबीसीतून सरसकट कुणबी मराठा म्हणून दाखले देण्याचा शासनाने अध्यादेश काढलेला आहे हा अध्यादेश जरी कुणबी समाजापुरता मर्यादित असला तरी त्याचा विपरीत परिणाम भविष्यात ओबीसीतील सर्व घटकांवर होणार आहे.
गुहागर तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीने गेली ४ ते ५ वर्ष ओबीसींच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सतत आपला लढा चालू ठेवला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या या अध्यादेशानुसार गुहागर तालुक्यातील कुणबी समाज आणि त्यांच्या बरोबरीने ओबीसीतील सर्व समाज घटकांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते १५ सप्टेंबर रोजी ११ वाजता गुहागर तालुका तहसील कार्यालय येथे येऊन तहसीलदारांना याबाबतचे निवेदन सादर करणार आहेत. सकाळी १० वाजता गुहागर नगरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सर्व ओबीसी बंधू-भगिनी गुहागर तहसीलदार कार्यालयाकडे कूच करणार आहेत.
या आंदोलनाच्या पूर्वतयारीची बैठक गुहागर बाजाराच्या माजी आमदार लोकनेते रामभाऊ बेंडल साहेब सभागृह शृंगारतळी येथे ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाते यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या अध्यादेशानुसार आता कुणबी मराठा आणि मराठा कुणबी असे जातीचे दाखले देण्यात येणार असले तरी भविष्यात या निर्णयाचा विपरीत परिणाम सर्व ओबीसी घटकांवर होणार असल्याने गुहागर तालुक्यातून ओबीसी प्रवर्गात येणारे सर्व घटक समाज संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून एकवटले आहेत.
या पूर्वतयारीच्या सभेवेळी माजी सभापती राजेश बेंडल, रामचंद्र हुमणे गुरुजी, ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे सेक्रेटरी निलेश सुर्वे, माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या नेत्रा ठाकूर, पद्माकर आरेकर, प्रदीप बेंडल, गुहागर तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष नवनीत ठाकूर, नाभिक समाजाचे अध्यक्ष संजय पवार, विश्वकर्मा सुतार समाजाचे अध्यक्ष धामणस्कर गुरुजी, वैश्य समाजाचे अध्यक्ष अजित भाऊ बेलवलकर, विजय मसुरकर, रामाणे गुरुजी, रवींद्र कुळे गुरुजी, ॲड. प्रमेय आर्यमाने, समीर डिंगणकर आदींसह गुहागर तालुका ओबीसी समाजातील सर्व प्रतिनिधी, ज्ञातीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समस्त ओबीसी समाजाच्या पुढच्या पिढींच्या उज्वल भवितव्यासाठी उभारण्यात येणाऱ्या लढ्यामध्ये गुहागर तालुक्यातील सर्व ओबीसी बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता गुहागर नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाते आणि सरचिटणीस निलेश सुर्वे यांनी केले आहे.