
नदीजोड प्रकल्पामुळे देशातील करोडो शेतकर्यांचे आयुष्य बदलून जाणार
देशाचा ३५ टक्के भाग सर्वसाधारण तर ३३ टक्के गंभीर दुष्काळप्रवण असल्यामुळे ३० ठिकाणी ३७ नद्या जोडणारा ५.५ लाख कोटींच्या नदीजोड प्रकल्पामुळे देशातील करोडो शेतकर्यांचे आयुष्य बदलून जाईल. देशाच्या उत्तर-पूर्व भागात वारंवार अनुभवायला येणारे पुरांचे दुष्परिणाम थांबतील आणि पश्चिम व दक्षिण भागातील पाण्याचे दुर्भिष्य संपुष्टात येईल. सन १९९९ मध्ये खासदार सुरेश प्रभू यांनी नदीजोड प्रकल्पाचा अभ्यास केला. त्यानंतर याला चालना मिळाली. लवकरच हा प्रकल्प दृष्टीक्षेपात असल्याची माहिती अभ्यासक ऍड. विलास पाटणे यांनी दिली. त्यासाठी तीन हजार जलाशय तर १४९० कि.मी.चे कालवे बांधण्यात येतील. यामुळे देशातील ३३ टक्के म्हणजे ३५ दशलक्ष हे. जमीन सिंचनाखाली येईल. यामधून ३४ हजार मेगावॅट वीजही उपलब्ध होईल असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प दृष्टीक्षेपात आहे. ना. नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान व उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेवून प्रकल्प युद्धपातळीवर मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पहिल्या टप्प्यात कर्णावती-बेतवा, वमणगंगा व पिंजळ, पार तापी-नर्मदा हे पन्नास हजार कोटींचे नदीजोड प्रकल्पांचा शुभारंभ होतो आहे. ना. नितीन गडकरी, खा. सुरेश प्रभू यांनी शेतकर्यांच्या आयुष्यात सुगीचे दिवस आणले असल्याचे ऍड. विलास पाटणे यांनी सांगितले.
www.konkantoday.com