
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला
घाटकोपर इथं मोठी दुर्घटना घडली. याठिकाणी महाकाय होर्डिंग वाऱ्यामुळे खाली पेट्रोल पंपावर कोसळले तेव्हा पंपावर पेट्रोल भरायला गेलेले अनेकजण त्याखाली अडकले.युवकाचाही समावेश होता. पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला अशी परिस्थिती युवक भरत राठोडवर ओढावली. भरत राठोड हा युवक मेडिकलमध्ये डिलिव्हरीचं काम करायचा. पेट्रोल भरण्यासाठी भरत पेट्रोल पंपावर गेला होता. त्याचवेळी होर्डिंग कोसळण्याची दुर्घटना घडली. त्यात भरतचा दुर्दैवी अंत झाला. भरत हा घाटकोपरच्या गोळीबार परिसरातील रहिवासी आहे. त्याच्या अचानक जाण्यानं कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. याबाबत स्थानिक रहिवाशी सांगतात की, भरतच्या घरची परिस्थिती खूप हलाखीची आहे. त्याच्या घरात कमावणारे कुणी नाही. अलीकडेच आजारपणामुळे त्याच्या वडिलांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. १०-१२ दिवस ते हॉस्पिटलमध्ये होते, नुकतेच त्यांना डिस्चार्ज दिलाय आणि आज हा प्रसंग घडला. कोरोना काळात आईचे निधन झालं असंही त्यांनी सांगितले. *४ तासांचा थरार, जखमी गुप्ता यांची सुटका*रमाबाई परिसरात राहणाऱ्या गुप्ता कुटुंबातील अशोक गुप्ता हे ९० फूट रोड परिसरात गॅरेजमध्ये काम करतात. सायंकाळी दुचाकीवरून ते पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेले. त्यावेळी अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. पेट्रोल भरून ते पैसे देणार इतक्यात त्यांच्या अंगावर होर्डिंग कोसळले. नेमकं काय झालं हे क्षणभर काहीच कळलं नाही. त्यानंतर त्यांनी पत्नीला फोन करून मदत मागितली. मी आतून आवाज देत होतो. पण माझ्यापर्यंत मदत पोहचत नव्हती. ४ तास मी आतमध्ये होतो. माझी शुद्ध हरपली त्यानंतर थेट रुग्णालयात जाग आल्याचं जखमी अशोक गुप्ता यांनी सांगितले. www.konkantoday.com