नवरात्र उत्सवाकरीता रत्नागिरी पोलीसांकडून नागरिकांना आवाहन
राज्यात कोरोना विषाणुची साथ चालु आहे त्याच बरोबर अनलॉकची प्रक्रिया देखील मोठया प्रमाणात सुरू आहे. त्या अनुषंगाने दिनांक १७/१०/२०२० रोजी पासून सुरु होणाऱ्या नवरात्र उत्सवाकरीता रत्नागिरी जिल्हयातील नागरिकांकरीता पोलीस अधीक्षक यांनी आवाहन केले आहे.
नवरात्र उत्सवामध्ये शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरीता ४ फुट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची २ फुटांची असावी. तसेच या उत्सवामध्ये गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे (उदा. रक्तदान, आरोग्य तपासणी) आयोजित करावे.)
देवीच्या मंडपामध्ये प्रत्यक्ष येवून दर्शन घेवु इच्छीणाऱ्या भाविकांसाठी कोविड -१९ च्या अनुषंगाने सुचना फलक लावावे. उदा. शारिरीक अंतर ठेवणे, मास्कचा वापर व सॅनिटायझरचा वापर करावा. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. सर्व नागरिकांनी या उत्सवात कोरोना विषाणुच्या अनुषंगाने आपली व आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेवून श्रध्देसोबतच सुरक्षिततेकडे लक्ष देवून उत्सव साजरा करावा.
कोविड – १९ विषाणुच्या अनुषंगाने वरिल दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन दिनांक १७/१०/२०२० रोजी पासून सुरू होणारा नवरात्र उत्सव शांततेत पार पाडावा असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी करून सर्व नागरिकांना नवरात्री उत्सवाकरीता शुभेच्छा दिलेल्या आहेत.
www.konkantoday.com