आमचे प्रश्न मार्गी लावा अन्यथा वीज देणार नाही;कोकण रेल्वेला शौकत मुकादमांचा इशारा
रेल्वे विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.लवकरच रेल्वे विजेवर धावणार आहे.परंतु आमचे अनेक प्रश्न रेल्वे प्रशासनाकडे प्रलंबित आहेत.ते प्रश्न प्रथम मार्गी लावा.अन्यथा आमची हक्काची कोयना आणि एनरॉनची वीज आम्ही कोकण रेल्वेला देणार नाही.असा स्पष्ट इशारा कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे.जसे पाणी बंद केले तसे वीज ही बंद करून टाकू असेही त्यांनी ठणकावले आहे.या बाबत मुकादम यांनी कोकण रेल्वे प्रशासनाला एक खरमरीत पत्र पाठवले आहे त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की कोकण रेल्वेमुळे कोकणातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.परंतु कोकणच्या विकासासाठी ते गरीब शेतकऱ्यांनी सोसले.मात्र कोकण रेल्वे प्रशासनाने कोकणाकडे नेहमीच दुर्लक्ष केले.स्थानिक कोकणी तरुणांना अद्यापही रेल्वेमध्ये स्थान दिले जात नाही.सातत्याने डावलले जात आहे.८० कोकणी तरुणांना नोकरी मध्ये स्थान द्या ही आमची मागणी प्रलंबित आहे.तसेच चिपळूण ते सीएसटी अशी स्वतंत्र पॅसेंजर गाडीची मागणी देखील दुर्लक्षित करण्यात आली आहे.चिपळूण रेल्वेस्थानक जंक्शन घोषित करून येथे एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्या ही देखील मागणी आहे.चिपळूण कराड मार्गाचा प्रश्न स्थगित पडला आहे.हा मार्ग कोकणासाठी अत्यंत महत्वाचा आहे.चिपळूण रेल्वे स्थानकावरील फ्लाट क्रमांक २ वर तिकीट खिडकी ची मागणी देखील मान्य झालेली नाही.असे अनेक प्रश्न रेल्वे प्रशासनाकडे प्रलंबित आहेत.असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. *आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून ते प्रश्न वर्षानुवर्षे तसेच ठेवायचे आणि आमची वीज खुशाल वापरायची असे आता चालणार नाही.प्रथम आमचे प्रश्न मार्गी लावा नंतरच वीज देऊ अन्यथा वीज देणार नाही.मग त्यावेळी जे काय करावे लागेल ते सर्व करू असे शौकत मुकादम यांनी ठणकावले आहे
www.konkantoday.com