चतुरंग सुवर्णमहोत्सवानिमित्त रत्नागिरीत शनिवार दि 28 ऑक्टोबर रोजी स्वर्णसंगीतोत्सव


नाट्यसंगीत, वाद्यजुगलबंदीची पर्वणी
कोजागिरी पौर्णिमेच्या रम्य पार्श्वभूमीवर संगीतप्रेमी रत्नागिरीकरांना रंगतदार संगीतोत्सवाची पर्वणी लाभणार आहे. सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अभिनव उपक्रम हाती घेऊन वाटचाल करणाऱ्या चतुरंग प्रतिष्ठान संस्थेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष चालू आहे. गेल्या पन्नास वर्षात गिरगाव, डोंबिवली, चिपळूण, पुणे, गोवा अशा शहरात विस्तारलेल्या चतुरंग प्रतिष्ठानने ६ वर्षापूर्वी रत्नागिरीत सुद्धा काम सुरू केले. मुक्तसंध्या, दिवाळी पहाट, स्वातंत्र्याचे पूर्वरंग या उपक्रम मालिकेतून साजऱ्या होणाऱ्या अनेक कार्यक्रमांना रत्नागिरीकर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अशाच दर्दी, सजग, जाणत्या रसिक श्रोत्यांच्या साथीनेच संस्थेचा सुवर्णमहोत्सवी सोहळा साजरा व्हावा या उद्देशाने चतुरंग तर्फे संगीतोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार – रविवार, दि. २८-२९ ऑक्टोबर अशा दोन दिवसात साजऱ्या होणाऱ्या या संगीत कार्यक्रमांत पहिल्या दिवशी नाट्यसंगीत मैफल रंगणार आहे. स्व. विद्याधर गोखले,नटवर्य स्व.भालचंद्र पेंढारकर आणि स्व.पं.राम मराठे यांच्या जन्मशताब्दीचे निमित्त साधून त्यांनी अजरामर केलेल्या संगीत नाटकांतील नाटयपदांचे गायन रंगणार आहे. श्री. राजाभाऊ शेंबेकर, सौ. नीलाक्षी पेंढारकर, श्री.ओंकार प्रभुघाटे, कु.प्राजक्ता काकतकर आणि श्री. विशारद गुरव यांच्या गायन सहभागास श्री.हेरंब जोगळेकर (तबला), श्री.हर्षल काटदरे (ऑर्गन), श्री.मंगेश चव्हाण (पखवाज), श्री. निबंध कानिटकर (निवेदन) यांची साथसंगत लाभणार आहे. दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध तबलावादक श्री. सत्यजित तळवलकर यांच्यासोबत श्री. प्रताप पाटील (पखवाज), श्री.नवीन शर्मा (ढोलक), श्री.श्रीधर पार्थसारथी (मृदुंगम) यांची तालवाद्याची जल्लोषी मैफल रंगणार असून त्यात अभिषेक शिनकर हार्मोनियम ची साथ करतील. याच दिवशी एका छोटेखानी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. चतुरंग चे रत्नागिरी केंद्र उभे राहण्यास ज्या हितचिंतकांचे अनेक अर्थाने सहकार्य लाभले, सहयोग – आधार मिळाला अशा ५ सन्मानमूर्तींचा सन्मान ज्येष्ठ वृत्तनिवेदक, लेखक, विश्लेषक, डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते होणार आहे.

दोन दिवस साजरा होणारा हा स्वर्णसंगीतोत्सव शहरातील मध्यवर्ती जयेश मंगल कार्यालय, थिबा पॅलेस रोड येथे सायंकाळी ६.०० ते रात्रौ. १०.०० या वेळेत होणार आहे. या महोत्सवी कार्यक्रमासाठी सहकार क्षेत्रातील अग्रणी स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे सहकार्य लाभणार आहे.

या स्वर्णसंगीतोत्सवाच्या निमित्ताने चतुरंगच्या सुवर्णमहोत्सवी आनंदसोहळ्यात आपण आपल्या नातेवाईक, मित्र मंडळींसह आवर्जून सहभागी होऊन संगीत मैफिलींचा आनंद घ्यावा असे आवाहन चतुरंग ने आपल्या प्रसिद्ध पत्रकात केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button