कोविड रुग्णालयातील सांडपाणी रस्त्यावर, उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
महिन्याभरापूर्वी उद्यमनगर येथील महिला रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयातील सांडपाणी थेट रस्त्यावर येत असल्याचा प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या या इमारतीला सांडपाणी वाहून नेण्याची यंत्रणा बसवण्यात आली होती का नाही असा सवाल येथील स्थानिक नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
रत्नागिरीतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन उद्यमनगर येथील महिला रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून कार्यान्वित करण्यात आले. या निर्णयाचे येथील स्थानिक नागरिकांनी स्वागत केले. मागील महिनाभर या कोविड सेंटरच्या ठिकाणी व्यवस्थित कारभार सुरू होता. मात्र आता या कोविड सेंटर मधील सांडपाणी थेट रस्त्यावर येऊ लागल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या महिला रुग्णालयाचे नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. मात्र या रुग्णालयाचे सांडपाणी जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची सोय केलेली दिसुन येत नाही.या रुग्णालयाचे सर्व सांडपाणी हे रुग्णालयाच्या आवारा बाहेर सोडण्यात येत आहे व ते सांडपाणी रस्त्यावरुन जात आहे. कोविड सेंटरच्या परिसरात ठिकठीकाणी पाणी साचलेले दिसुन येते. या भागात मोठी वस्ती देखील आहे. या सांडपाण्यामुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकेल यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने दखल घेऊन यावर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे
www.konkantoday.com