वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा धसका घेऊन रुग्णालयातून पळालेल्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला
कोरोना विषाणुचा दिवसागणिक फैलाव वाढत असताना कोरोनाचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा धसका घेऊन रुग्णालयातून पळालेल्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला. हा प्रकार शनिवारी जिल्हा रुग्णालयामध्ये घडला. जिल्हा रुग्णालयाच्या अशा कारभाराबाबत लोकांमधून तीव्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तालुक्यातील भू येथील रुग्णाच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे.
तालुक्यातील भू येथील दीपक कुंभार यांना गेल्या बुधवारी जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले होते. त्यांचा स्वॅब घेतल्यानंतर त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असे सांगण्यात आले. तालुका प्रशासनाने तातडीने भू येथील तीन वाड्या कंटेन्मेंट झोन घोषित करून पुढील कार्यवाही सुरू केली.भू येथील व्यापाऱ्यांनीही खबरदारी म्हणून तीन दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय तातडीने घेतला.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयातून हा रुग्ण पळाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर उडालेल्या गोंधळामध्ये दीपक कुंभार याचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगत जिल्हा रुग्णालयाकडून चूक झाल्याची कबुली देण्यात आली त्यामुळे जिल्हा रूग्णालयाच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे
www.konkantoday.com