
उमेदच्या खासगीकरणाला विरोध- माजी आमदार बाळ माने
रत्नागिरी : राज्यात उमेद अभियानाचे खासगीकरण केले जात असल्याचे वृत्तपत्रातील बातम्यांवरून समजले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून चालवल्या जाणार्या ‘उमेद’चे खासगीकरण झाल्यास त्याचा विपरित परिणाम होईल. याविरोधात महिलांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत उमेदचे खासगीकरण होऊ नये, अशी आग्रही मागणी भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी केली आहे. यासंदर्भात प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही भूमिका मांडू, असेही माने यांनी स्पष्ट केले.
‘उमेद’मुळे खेड्यापाड्यातील स्त्रियांना आत्मनिर्भरपणे जगायला शिकवले. परंतु आता खासगीकरणामुळे खेडेगावातील स्त्रियांमध्ये नाराजी पसरली आहे. याबाबत शासनाच्या ग्रामविकास खात्याची नक्की भूमिका काय असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. कोरोना व त्यापाठोपाठ लॉकडाऊनमुळे आलेली मंदी पाहता ‘उमेद’ने महिलांना चांगली संधी दिली आहे. उमेदमुळे महिलांना आर्थिक स्थैर्य, कर्ज, बँक व्यवहाराची माहिती समजली. ग्रामसभांना त्यांची उपस्थिती वाढली. या यंत्रणेमार्फत खेड्यापाड्यात बचत गट स्थापन मोठ्या प्रमाणावर स्थापन होत आहेत. खासगीकरणामुळे आता हे काम करणारे व अन्य कर्मचारी बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे कोणत्याही स्थितीत उमेदचे खासगीकरण करू नये तसेच यातील कंत्राटी कामगारांची सेवा खंडित करू नये, अशी मागणी बाळ माने यांनी केली.
www.konkantoday.com